प्रेमविवाहाचा करुण अंत! पायांना साखळीने बांधून तापी नदीत पती-पत्नीने घेतली उडी

सुखवदजवळील घटना; पाडळसरेचे मूळ रहिवासी, प्रेमविवाह केलेल्या जोडप्याच्या मृत्यूने खळबळ

अमळनेर (प्रतिनिधी) प्रेमाने संसार थाटलेल्या तरुण पती-पत्नीचा प्रवास तापी नदीत संपल्याची घटना समोर आली आहे. पायांना लोखंडी साखळी बांधून कुलूप लावलेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मूळचे अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील आणि सध्या एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे वास्तव्यास असलेल्या या जोडप्याच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नरडाणा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कीं,  श्याम हरी पाटील (वय २८, मूळ रा. पाडळसरे, ता. अमळनेर; हल्ली रा. उत्राण, ता. एरंडोल) आणि त्यांची पत्नी सपना (वय २०) यांचे मृतदेह ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा परिसरात तापी नदीत तरंगताना आढळले. याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सचिन कापडणीस आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. यावेळी श्याम यांचा डावा पाय आणि सपना यांचा उजवा पाय लोखंडी साखळीने एकत्र बांधलेला असून, त्याला मोठे कुलूप लावलेले असल्याचे आढळले. त्यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.

श्याम पाटील हे काही वर्षांपूर्वी कामानिमित्त पाडळसरे गाव सोडून उत्राण येथे गेले होते. तेथे ते शेतीची कामे आणि ट्रॅक्टर चालविण्याचे काम करीत होते. सपना या आपल्या बहिणीकडे उत्राण येथे राहत होत्या. याच काळात श्याम आणि सपना यांची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी प्रेमविवाह केला. तीन ते चार दिवसांपूर्वी हे जोडपे बाहेरगावी गेले होते. दरम्यान, मृत्यूच्या दोन दिवस आधी रात्री एक वाजेच्या सुमारास त्यांनी नातेवाइकांना फोन करून ‘आम्ही आता राहत नाही,’ असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर नातेवाइकांनी घटनास्थळी गर्दी केली. पती-पत्नीचे मृतदेह साखळीने बांधलेल्या अवस्थेत आढळल्याने मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणी नरडाणा पोलीस पुढील तपास करीत असून, शवविच्छेदन आणि तपासातून मृत्यूमागील कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *