
मंगरूळच्या शेतरस्त्याचा ३० वर्षांचा वाद लोकअदालतीत मिटला
अमळनेर (प्रतिनिधी) मंगरूळ येथील शेतकरी आणि अमळनेर सहकारी औद्योगिक वसाहत यांच्यात शेतरस्त्यावरून अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद ५ ऑक्टोबर रोजी महात्मा ज्योतिराव फुले अभियान महसूल लोकअदालतीत सामंजस्याने मिटला. तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांच्या मध्यस्थीने औद्योगिक वसाहतीने स्वतःच्या जागेतून शेतकऱ्यांसाठी ३० फूट रुंदीचा रस्ता उपलब्ध करून देण्यास संमती दिली. त्यामुळे शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागला आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले अर्धन्यायिक महसुली वाद सामंजस्याने मिटविण्यासाठी शासनाच्या वतीने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी महात्मा ज्योतिराव फुले अभियानांतर्गत महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत मंगरूळ येथील उमेश मकवाना, युवराज पाटील, श्रीराम पाटील, योगेश पाटील, जण्याबाई पाटील, आरस्तोल पाटील, उशाबाई पारख, छोटू पाटील, मंगल पाटील आणि निकिता पाटील या शेतकऱ्यांच्या शेतरस्त्याचा प्रश्न मांडण्यात आला. धुळे रस्त्यालगत असलेल्या अमळनेर सहकारी औद्योगिक वसाहतीच्या जागेतून हे शेतकरी गेल्या ३० ते ४० वर्षांपासून शेतात जाण्यासाठी रस्त्याचा वापर करीत होते. मात्र, औद्योगिक वसाहतीत बांधकाम होणार असल्याने शेतकऱ्यांच्या पारंपरिक मार्गात अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. याबाबत तहसीलदारांकडे वाद प्रलंबित होता. तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांनी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन जगदीश चौधरी, सचिव वसंत मराठे आणि संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न लोकअदालतीत सामंजस्याने सोडविण्याचा प्रयत्न केला. तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांच्या मध्यस्थीला सकारात्मक प्रतिसाद देत चेअरमन जगदीश चौधरी आणि सचिव वसंत मराठे यांनी ५ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना औद्योगिक वसाहतीच्या जागेतून रस्ता देण्यास संमती दिली. त्याबाबत संमतीपत्रही तत्काळ देण्यात आले. पर्यायी रस्ता लांब पडत असल्याने ३० फूट रुंदीचा रस्ता उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी शेतकऱ्यांतर्फे वकील निकिता पाटील, महसूल विभागातील महसूल सहाय्यक अधिकारी रुपाली अडकमोल आणि लिपिक चैताली सैतवाल उपस्थित होते.
लोकअदालतीत सामंजस्याने प्रश्न सुटतात
“लोकअदालतीत सामंजस्याने प्रश्न मिटतात. दोन्ही पक्षांनी समजून घेतल्यास वेळ आणि पैसे वाचतात. अमळनेर सहकारी औद्योगिक वसाहतीने स्वतःची जागा देऊन औदार्य दाखवले. त्यामुळे अनेक वर्षांपासूनचा प्रश्न लवकर मिटला.”
– डॉ. उमा ढेकळे, तहसीलदार, अमळनेर

Leave a Reply