तांबेपुरात रिक्षातच आदिवासी महिलेची सुखरूप प्रसूती; सरपंच, नगरसेवकांसह आरोग्य यंत्रणा मदतीला धावली

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील अंतुर्ली येथील एका आदिवासी महिलेची प्रसूतीसाठी अमळनेरला येत असताना रस्त्यातच पॅजो रिक्षामध्ये सुखरूप प्रसूती झाल्याची घटना सोमवारी दि. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे सव्वा सात वाजता नंदगाव रस्त्यावरील तांबेपुरा परिसरात घडली. वेळेत मदत मिळाल्याने माता आणि नवजात बालक दोघेही सुरक्षित आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंतुर्ली येथील शेतमजूर संगीता पावरा यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर त्यांचे पती त्यांना पॅजो रिक्षातून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात घेऊन येत होते. मात्र नंदगाव रस्त्यावरील तांबेपुरा परिसरात पोहोचताच त्यांची प्रसूती सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच नगरसेविका अफसाना खाटीक, अंतुर्ली-रंजाणे येथील सरपंच सचिन पाटील, माजी नगरसेवक मुख्तार खाटीक, माजी नगरसेवक बाळा पवार तसेच परिसरातील महिला तातडीने मदतीसाठी घटनास्थळी पोहोचल्या. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रकाश ताळे यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी त्वरित रुग्णवाहिका आणि आरोग्य कर्मचारी योगिता कुलकर्णी यांना घटनास्थळी पाठविले. त्यांच्या मदतीने महिलेची सुरक्षित प्रसूती करण्यात आली. त्यानंतर संगीता पावरा आणि नवजात बालकाला पुढील उपचार व वैद्यकीय तपासणीसाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती चांगली असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, अंतुर्ली ते अमळनेर मार्गावरील रस्त्याची दुरवस्था असल्याने रुग्णालयात पोहोचण्यास विलंब झाल्याचे सांगण्यात येत असून, या घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा आणि रस्त्यांच्या स्थितीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *