
कर्जवसुलीच्या नावाखाली ग्राहकांना त्रास? बजाज फायनान्सविरोधात शिवसेना–युवासेनेचे निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) : बजाज फायनान्सच्या कर्जवसुली प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना कथित धमकी, शिवीगाळ, मानसिक त्रास, आरडाओरड आणि अपमानास्पद वागणूक दिल्याच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले.
विनोद पाटील (शिरूर) आणि वाल्मीक चौधरी (अमळनेर) यांनी कर्जवसुलीच्या संदर्भात बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्यांकडून मानसिक त्रास, धमकी आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर झाल्याची तक्रार पदाधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने अमळनेर येथील बजाज फायनान्सचे मॅनेजर दीपक चौधरी यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करण्यात आली. यावेळी उद्धट व आक्षेपार्ह पद्धतीने उत्तर देण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
कर्जाचा हप्ता थकीत असल्यास वित्तीय संस्थेला कायदेशीर चौकटीत राहून वसुली करण्याचा अधिकार आहे. मात्र, वसुलीच्या नावाखाली ग्राहकांना धमकावणे, शिवीगाळ करणे किंवा अपमानित करणे अयोग्य असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवून फोन कॉल रेकॉर्डिंग, ऑडिओ-व्हिडिओ पुरावे आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी करावी तसेच चौकशीअंती कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भविष्यात सर्वसामान्य नागरिकांना कर्जवसुलीच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास किंवा धमकी दिली जाणार नाही, यासाठी संबंधित वित्तीय संस्थेला आवश्यक सूचना देण्याचीही मागणी करण्यात आली. “ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि न्यायासाठी शिवसेना–युवासेना ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील,” असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख गुलाब काशिनाथ पाटील, युवासेना तालुकाप्रमुख राहूल भास्कर कंजर, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण पुरुषोत्तम पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख पंकज संतोष शेटे, उपतालुका प्रमुख राहूल साहेबराव पाटील, उपतालुका प्रमुख जयेश रवींद्र चव्हाण, युवासेना उपशहर प्रमुख राजा अल्ताफ राजा शेख, युवासेना पदाधिकारी ईश्वर जाधव, सचिन विलास पाटील आणि प्रदीप किरण देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply