
ताडेपुरा स्मशानभूमीची दुरावस्था; सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील ताडेपुरा सार्वजनिक स्मशानभूमी येथे अंत्यविधीसाठी आवश्यक सुविधांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याने नागरिकांना अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याची बाब समोर आली आहे. याबाबत २४ मार्च रोजी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून तात्काळ दुरुस्ती व अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नगरपालिकेचे माजी आरोग्य समिती सभापती शाम जयवंतराव पाटील यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ताडेपुरा स्मशानभूमी येथे जुन्या अंत्यविधी शेडखालील तीनही अंत्यविधी बेडचे कठडे तुटलेल्या अवस्थेत आहेत. एका दिवसात तेथे तीन अंत्यविधी पार पडले, मात्र बेडची दुरावस्था असल्यामुळे अंत्यविधी करताना मृतांच्या नातेवाईकांना व कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. नवीन अंत्यविधी शेडचे काम सुरू असले तरी ते अपूर्ण अवस्थेत असून त्याठिकाणी अंत्यविधी बेडची कोणतीही व्यवस्था नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात लोखंडी सळई व तारांच्या साहाय्याने बेड तयार करून अंत्यविधी करावे लागले. या प्रकारामुळे अंत्यविधी करताना मृतदेहाची अवहेलना होत असल्याची भावना नातेवाईकांमध्ये निर्माण होत असून ही बाब शहराच्या सांस्कृतिक प्रतिष्ठेला धक्का देणारी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. नगरपरिषद व संबंधित मक्तेदार यांच्यात तांत्रिक वाद सुरू असल्यामुळे काम रखडल्याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांकडून मिळाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी तात्काळ लक्ष घालून ताडेपुरा स्मशानभूमी येथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नगरपरिषदेत सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी आमदार शिरीष चौधरी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून नगरपरिषद व मक्तेदार यांच्यात समन्वय साधून प्रश्न मार्गी लावण्याची विनंती करण्यात आली. यावेळी अक्षय चव्हाण, हर्षल महाजन, उज्वल मोरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply