
बालहक्क संरक्षणासाठी नवी दिल्लीत राष्ट्रीय परिषद; आधार बहुउद्देशीय संस्थेचा सहभाग
अमळनेर (प्रतिनिधी) : बालकांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांना न्याय मिळवून देणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रेन यांच्या वतीने “ॲक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रेन – नॅशनल कन्सल्टेशन ऑन एन्श्युरिंग अ चाइल्ड्स राइट्स, पोटेन्शियल अँड प्रॉस्पेरिटी” या राष्ट्रीय सल्लामसलत परिषदेचे आयोजन २७ ते ३० जुलै २०२६ या कालावधीत कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया, नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय सल्लामसलत परिषदेच्या उद्घाटन समारंभास भारत सरकारच्या महिला व बाल विकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर, खासदार लालू कृष्ण, एम. पी. फोरम फॉर चिल्ड्रेनचे प्रतिनिधी तसेच जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रेनचे संस्थापक भुवन ऋभू यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी बालकांच्या हक्कांचे संरक्षण, बाल लैंगिक शोषण व अत्याचारापासून संरक्षण, बालविवाह प्रतिबंध, बाल तस्करी रोखणे तसेच बालकांना न्यायव्यवस्थेपर्यंत सुलभ आणि प्रभावी प्रवेश मिळवून देणे या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. बालकांचे सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि हक्काधिष्ठित भविष्य घडविण्यासाठी शासन, न्यायव्यवस्था, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि समाजातील विविध घटकांनी समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.
या राष्ट्रीय सल्लामसलत परिषदेत देशभरातील बालहक्क क्षेत्रात कार्यरत संस्था, सामाजिक कार्यकर्ते, तज्ज्ञ आणि विविध प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. बालहक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अनुभवांची देवाणघेवाण, चांगल्या कार्यपद्धतींचे आदान-प्रदान तसेच भविष्यातील कृती आराखडा निश्चित करण्याच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या परिषदेत आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर, जिल्हा जळगाव यांच्या प्रतिनिधींनीही सहभाग नोंदविला. देशभरातील बालहक्क संरक्षणासाठी कार्यरत विविध संस्थांबरोबर अनुभवांची देवाणघेवाण करण्याची आणि नवीन उपक्रमांची माहिती जाणून घेण्याची संधी या परिषदेमुळे उपलब्ध झाल्याचे संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले.
संबंधित घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत
“बालकांचे हक्क अबाधित राहावेत, प्रत्येक बालकाला सुरक्षित वातावरण मिळावे आणि त्याच्या क्षमता व स्वप्नांना योग्य संधी मिळावी, यासाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.”
-आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र

Leave a Reply