
अमळनेर आरटीओ कॅम्पमध्ये सर्व परिवहन सेवा सुरू करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
आमदार अनिल पाटील व उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन

अमळनेर(प्रतिनिधी )येथील आरटीओ कॅम्पमध्ये सर्व परिवहन सेवा सुरू करणेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमळनेर शहराच्या वतीने आमदार अनिल पाटील यांना व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव निवेदन देण्यात आले.
यात म्हटले आहे की महाराणा प्रताप चौकातील जुन्या रेस्ट हाऊस येथे गेल्या 30 वर्षांपासून परिवहन विभागाचा आरटीओ कॅम्प भरत होता. गेल्या 3 वर्षांपासून हा कॅम्प शहरापासून 4 किमी अंतरावर ढेकू रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत स्थलांतरित करण्यात आला आहे.
सध्या दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या सोमवारी हा कॅम्प भरतो, परंतु तेथे केवळ ड्रायव्हिंग लायसन्सचीच कामे केली जातात. त्यामुळे नागरिकांना इतर कामांसाठी भडगाव 60 किमी व जळगाव येथे जावे लागते.
15 वर्षे जुन्या वाहनांचे नूतनीकरण करण्यासाठी वाहनासह भडगावला जावे लागते, यामुळे इंधन, वेळ आणि पैशाचा मोठा भुर्दंड पडतो. मालवाहू वाहनांच्या फिटनेससाठी SLD आणि ECU सर्टिफिकेटसाठी भडगाव व फिटनेससाठी जळगाव अशी दुहेरी हेलपाटे मारावे लागतात. वाहन हस्तांतरणासाठी देखील भडगावला जावे लागते. शहराबाहेरील कॅम्प आणि पुन्हा भडगावचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे.
अमळनेर हा मोठा तालुका असून येथे मोठ्या प्रमाणात वाहन संख्या आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अमळनेर आरटीओ कॅम्पमध्येच 15 वर्षे जुन्या वाहनांच्या नूतनीकरणाची सुविधा, वाहन फिटनेस, हस्तांतरण व इतर सर्व आरटीओ सेवा सुरू कराव्यात. कॅम्प पूर्वीप्रमाणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी भरवावा किंवा शहरापर्यंत एसटीची सोय करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर राष्ट्रवादी शहराध्यक्ष चेतन राजपुत,जितेंद्र ठाकूर, कार्याध्यक्ष जितेंद्र झाबक, कार्याध्यक्ष गोविंदा बाविस्कर,ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष प्रा दिनेश शेलकर,ओबीसी शहराध्यक्ष अरुण पाटील,युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे,शहर उपाध्यक्ष बिपीन पाटील, विजय पाटील, प्रविण देशमुख,जयेश पाटील,गौरव पाटील, जितेंद्र मराठे यांच्या सह्या आहेत. तर आमदार अनिल पाटील यांना निवेदन देताना नगरसेवक भरत ललवाणी,शेतकी संघ संचालक विक्रांत पाटील यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदारांनी दिले परिवहन अधिकाऱ्यांना पत्र
आमदार अनिल पाटील यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेत जळगाव उप परिवहन अधिकाऱ्यांना अमळनेर कॅम्प मध्ये सर्व सुविधा तात्काळ सुरू करण्याबाबत पत्र दिले असून परिवहन विभाग सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply