
मांडळ येथे भीषण आग; खळे, चारा व शेती साहित्य जळून खाक, लाखोंचे नुकसान
ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात; बैल भाजला, शेडही कोसळले
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडळ येथे अचानक लागलेल्या भीषण आगीत खळे, शेती साहित्य, ठिबक संच, चारा व इतर साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना ३ जून रोजी रात्री सुमारे ११ वाजेच्या दरम्यान घडली. तब्बल चार ते पाच तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली, मात्र बुधवारी सकाळपर्यंत आगीची धग कायम होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, मांडळ येथील मराठी शाळेसमोरील भानुदास हिम्मतराव पाटील, ललित पाटील आणि रंजन पाटील यांच्या खळवाडीत अचानक आग लागली. आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. खळ्यातील जनावरे तत्काळ बाहेर काढण्यात आल्याने मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मिळेल त्या साधनांच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. सुदर्शन पवार यांनी मुख्याधिकारी गणेश शिंदे तसेच मारवड पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी अग्निशमन दल प्रमुख गणेश गिरी यांना तातडीने अग्निशमन वाहन पाठविण्याच्या सूचना केल्या.
अग्निशमन दलाचे कर्मचारी आनंदा झिम्बल व भिकन पठाण यांनी घटनास्थळी पोहोचून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, एका वाहनातील पाणी संपल्यानंतर दुसरे वाहन येण्यास वेळ लागणार असल्याने गावातील उपलब्ध पाण्याचा वापर करून आग नियंत्रणात आणण्यात आली. ग्रामस्थांच्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला. या आगीत भानुदास हिम्मतराव पाटील व ललित पाटील यांचे ठिबक नळ्या, शेती साहित्य, लाकडी बैलगाडी, नांगर, पांभर व इतर साहित्य जळून खाक झाले. तसेच सुमारे ३० ते ४० ट्रॅक्टर चारा आगीत भस्मसात झाला. रंजन पाटील यांचे पाईप व चाऱ्याचेही मोठे नुकसान झाले. आगीत त्यांचा एक बैल भाजला गेला असून खळ्यात उभारलेले शेडही कोसळले. या घटनेत संबंधित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply