पुराच्या संकटावर मात; अमळनेर बाजार समितीचे कामकाज १७ ऑगस्टपासून पूर्ववत सूर होणार

अमळनेर (प्रतिनिधी) :अमळनेर शहर आणि तालुक्यात ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज आता पुन्हा सुरळीत होणार असून १७ ऑगस्टपासून शेतमाल लिलाव पूर्ववत सुरू करण्यात येणार आहेत. बाजार समितीचे सभापती, संचालक मंडळ आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आपला शेतमाल बाजार समितीत आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

३१ जुलैच्या महापुराचा सर्वाधिक फटका अमळनेर बाजार समितीला बसला होता. बाजार समितीच्या मागील बाजूस असलेली संरक्षक भिंत पुराच्या पाण्याच्या तडाख्याने कोसळल्याने मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी आवारात शिरले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मालाचे आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले. या आपत्तीत व्यापाऱ्यांचे सुमारे दोन कोटी रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पूरपरिस्थितीनंतर १ ऑगस्टपासून शेतमाल लिलाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत होता. सलग १५ दिवस व्यवहार ठप्प राहिल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला, तर शेतमाल विक्रीसाठी पर्यायी व्यवस्था शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. दरम्यान, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ तसेच आमदार अनिल पाटील यांनी बाजार समितीला भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यापारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. पूरपरिस्थितीतून सावरत आता बाजार समितीचे कामकाज पूर्वपदावर येत असून १७ ऑगस्टपासून लिलाव प्रक्रिया नियमितपणे सुरू होणार आहे. त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी या दोघांनाही मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *