
अमळनेर तालुक्यात आगीच्या मालिकेने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; लाखो रुपयांची झाली हानी
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात सलग दोन दिवस विविध ठिकाणी लागलेल्या आगींमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,. दि. २२ रोजी लोण पंचम शिवारात दुपारी तीन वाजेच्या सुमारास संजय प्रल्हाद पाटील यांच्या गट क्रमांक ७ मधील शेतात अचानक आग लागली. निलेश वानखेडे यांनी घटनेची माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आग नियंत्रणात आणण्यात यश आले, मात्र तोपर्यंत सुमारे १ हेक्टर ६३ आर क्षेत्रातील १५० ते २०० क्विंटल मका व गुरांचा चारा जळून खाक झाला. या आगीत सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले. यानंतर दि. २३ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मंगरूळ येथे कल्पना पाटील व दगाजी देवराम पाटील यांच्या पाच ते सहा एकर क्षेत्राला आग लागली. या घटनेत मका पिकासह ठिबक सिंचनाच्या नळ्यांचे मोठे नुकसान झाले असून सुमारे तीन ते चार लाख रुपयांची हानी झाली. सरपंच समाधान पारधी व पोलीस पाटील भागवत पाटील यांनी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना माहिती दिल्यानंतर अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली जफर पठाण, दिनेश बिऱ्हाडे, मच्छीन्द्र चौधरी, वसीम पठाण व लखन कंखरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील शेतांचे मोठे नुकसान टळले.
त्याच दिवशी दुपारी पावणे दोन वाजता रणाईचे येथे प्रकाश तापिराम पाटील यांच्या शेतातील सुमारे दोन बिघे मका जळून खाक झाला असून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. येथेही अग्निशमन दलाने प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सायंकाळी झाडी येथे श्याम साहेबराव पाटील यांच्या सबगव्हाण रस्त्यालगत असलेल्या शेतातील पक्क्या घराला अचानक आग लागली. या आगीत ठिबक नळ्या, चारा व शेती साहित्य जळून गेले. गावकऱ्यांसह अग्निशमन दलाने तत्परतेने प्रयत्न करून आग विझवली. तालुक्यातील या सलग आगीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने कारणांचा शोध घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply