कन्यादिनीच लेकीच्या डोळ्यांसमोर हिरावला बाप; उड्डाणपुलावरील दुर्दैवी अपघातात ज्योतिषाचा मृत्यू

लेकीसोबत घरी जात होते… कन्यादिनी बाप-लेकीचा प्रवास ठरला अखेरचा

अमळनेर (प्रतिनिधी) प्रताप महाविद्यालयाजवळील उड्डाणपुलावरून पिता-पुत्री दुचाकीने जात असताना दुचाकी कठड्याला धडकल्याने पिता पुलावरून खाली पडून गंभीर जखमी झाल्याची घटना २७ रोजी सायंकाळी घडली. या अपघातात केशव नगर येथील भृगु ज्योतिषी फर्मचे ज्योतिष विशारद विजय घनश्याम भार्गव उर्फ विजू महाराज (वय ४५) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी किरकोळ जखमी झाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, विजय घनश्याम भार्गव हे मोटारसायकल (क्रमांक एमएच १९ बीई १०२९) वरून मुलीसोबत शहराकडून केशव नगर येथील घरी जात होते. तत्वज्ञान केंद्राजवळ कोणत्यातरी वाहनाचा कट लागल्याने दोघेही दुचाकीवरून खाली पडले. यावेळी विजय भार्गव थेट पुलावरून खाली तत्वज्ञान केंद्राजवळ पडले. त्यांच्या डोक्याला व पोटाला गंभीर मार लागला. जखमी अवस्थेत ते बराच वेळ घटनास्थळी विव्हळत पडून होते. दरम्यान, प्रताप महाविद्यालयाचे कर्मचारी प्रविण डबेलकर व विजय भार्गव यांच्या पत्नी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी विजय भार्गव यांना एपे रिक्षातून डॉ. अनिल शिंदे यांच्या रुग्णालयात हलविले. मात्र, तोपर्यंत प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. विजय भार्गव यांच्या पश्चात पत्नी, आई व एक मुलगी असा परिवार आहे. ते ज्योतिषकार पन्नालाल भार्गव यांचे पुतणे होते. जागतिक कन्यादिनाच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

१५ मिनिटे घटनास्थळीच पडून होते जखमी अवस्थेत

 

या घटनेतील दुर्दैवाची बाब म्हणजे विजय भार्गव पुलावरून खाली पडल्यानंतर सुमारे १० ते १५ मिनिटे जखमी अवस्थेत घटनास्थळीच पडून होते. अनेक जण पुलावरून त्यांना पाहत होते, तर त्यांची मुलगी रडत होती. अखेर त्यांच्या पत्नी घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर प्रताप महाविद्यालयाचे कर्मचारी प्रविण डबेलकर यांच्या मदतीने त्यांना रिक्षातून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. कदाचित लवकर मदत मिळाली असती तर तातडीने उपचार होऊ शकले असते, अशी चर्चाही काही नागरिकांमध्ये होती.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *