३५ हजार ३३५ लाभार्थ्यांचे केवायसी बाकी; ३१ ऑगस्टनंतर धान्याचा लाभ बंद होण्याची शक्यता

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील तब्बल ३५ हजार ३३५ नागरिकांचे केवायसी अद्याप बाकी आहे. केवायसी करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली असून, या मुदतीत केवायसी न केल्यास संबंधितांचा धान्याचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, तालुक्यातील मयत, विवाहित महिला तसेच कधीही धान्य घेण्यासाठी न येणाऱ्या ९१६ नागरिकांची नावे लाभार्थी रेशनकार्डमधून कमी करण्यात आली आहेत.

शासनाच्या अंत्योदय योजनेअंतर्गत महिन्याला ३५ किलो धान्य आणि एक किलो साखर मोफत दिली जाते. तर प्राधान्य कुटुंब योजनेत प्रत्येक व्यक्तीला दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ, असे एकूण पाच किलो धान्य दिले जाते. मात्र, या योजनांचा लाभ घेणाऱ्यांमध्ये आयकर भरणारे, नोकरी करणारे, जास्त उत्पन्न असलेले तसेच शासकीय सेवेत असलेले नागरिकही असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.

तसेच मयत सभासद, विवाहित महिला आणि बाहेरगावी गेलेल्या लाभार्थ्यांच्या नावावर दुकानदारांकडून धान्य उचलले जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे शासनाच्या धान्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचे उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने ‘मिशन सुधार’ योजना सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत ऑनलाइन तपासणी करून जास्त उत्पन्न असतानाही अंत्योदय योजनेचा लाभ घेणारे, घरात चारचाकी किंवा दुचाकी असलेले तसेच नोकरीला असतानाही प्राधान्य कुटुंब योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी शोधले जात आहेत. पात्रता नसलेल्या लाभार्थ्यांचे रेशनकार्ड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत संबंधित दुकानदार तसेच नागरिकांनी पात्र नसलेली कार्डे स्वतःहून जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

तालुक्यात ५३ हजार ४६६ लाभार्थी कार्ड

 

अमळनेर तालुक्यात अंत्योदय योजनेचे आठ हजार ९४० लाभार्थी कुटुंब असून, त्यातील ३५ हजार ३१३ युनिट लाभ घेत आहेत. तर प्राधान्य कुटुंब योजनेचे ४४ हजार ५२६ लाभार्थी असून, त्यात एक लाख ८१ हजार ११६ युनिट लाभ घेत आहेत. तालुक्यात दोन्ही योजनांची मिळून एकूण ५३ हजार ४६६ लाभार्थी कार्ड असून, त्यावर दोन लाख १६ हजार ४२९ नागरिक लाभ घेत आहेत. त्यापैकी ३५ हजार ३३५ नागरिकांचे केवायसी बाकी आहे.

 

पात्रता नसल्यास कार्ड बदलण्याचे आवाहन

 

जास्त उत्पन्न असलेले, आयकर भरणारे तसेच शासकीय नोकरी करणाऱ्या नागरिकांनी सोमवार, २४ ऑगस्टपर्यंत आपले कार्ड बदलवून घ्यावे, अन्यथा त्यांच्यावर उचित कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

 

केवायसीची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत

 

“केवायसी करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत असून नागरिकांनी स्वतःहून करून घ्यावे किंवा मेरा के वाय सी ऍप डाउन लोड करून घरबसल्या के वाय सी करून घ्यावे अन्यथा पात्र नसल्याचे ग्राह्य धरण्यात येऊन लाभ बंद केले जातील.”

 रुकसाना शेख, पुरवठा निरीक्षण अधिकारी, अमळनेर

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *