रक्तदानातून कळमसरेत हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश; १०० हून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथे राम रहीम गणेश मित्र मंडळ व अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले. ‘रक्तदान ही सर्वोत्तम सेवा… मानवतेचा खरा उत्सव’ या संदेशासह आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात जवळपास १०० हून अधिक जणांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजसेवेला हातभार लावला.

याप्रसंगी मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी आणि पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार यांनीही रक्तदान करून या उपक्रमाला प्रोत्साहन दिले. तसेच तरुणांना ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ हा संदेश देत रक्तदान चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. कळमसरे येथील राम रहीम गणेश मंडळाचे हे पहिलेच वर्ष असून, सलग दहा ते बारा दिवस मंडळाच्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देत विविध समाजाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंडळाच्या या विविधांगी उपक्रमांचे संपूर्ण पंचक्रोशीत कौतुक होत आहे. गावातील हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत राम रहीम गणेश मंडळाची स्थापना करून एकात्मतेचा संदेश दिल्याने समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण झाला असून गाव परिसरासह तालुक्यात मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी लायन्स क्लब ऑफ अमळनेरचे अध्यक्ष जितेंद्र पारख, पंकज मुंदडा, विनोद अग्रवाल, चंद्रकांत महाजन, हरिकिशन सोनी यांच्यासह क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. रक्तदान शिबिरात माजी उपसरपंच पिंटू राजपूत, महेमूदखा पठाण, हिरालाल महाजन, डॉ. कपिल महाजन, भागवत कोळी, प्रतीक महाजन, दत्तात्रय चौधरी, राम रहीम मंडळाचे अध्यक्ष नईम पठाण, उपाध्यक्ष मोतीलाल महाजन, दिलीप चौधरी, दिपक पाटील, शब्बीर खाटीक, वसीम पठाण, पाडळसरे येथील सामाजिक कार्यकर्ते सागर कोळी यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते तसेच गावातील सर्व समाज बांधव व मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *