
श्री मंगळग्रह मंदिरात आज होणार श्री सत्यनारायण महापूजा
अमळनेर (प्रतिनिधी) : श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या महापूजेचे विशेष मानकरी नगरसेवक अनिल महाजन ऊर्फ आबू दादा व त्यांच्या धर्मपत्नी निरांजनीताई महाजन यांच्या शुभहस्ते सकाळी साडेआठच्या सुमारास मंत्रोच्चारासह महापूजेचा विधिवत प्रारंभ होणार आहे.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी श्रावण मासानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले जाते. श्रावण मासात भगवान विष्णूंच्या सत्यनारायण स्वरूपाची महापूजा करणे पवित्र व पुण्यफलदायी मानले जाते. या कालावधीत वातावरण सात्त्विक असल्याने भक्तिभावाने महापूजेत सहभागी होण्याला विशेष महत्त्व असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
महापूजेनिमित्त मंदिरात धार्मिक वातावरण निर्माण होणार असून, शहरासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री मंगळग्रहाचे दर्शन घ्यावे आणि तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे. भाविकांसाठी सकाळी ९ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत दर्शन व तीर्थप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Reply