आषाढी वारीत वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी विशेष वैद्यकीय पथक

अमळनेर (प्रतिनिधी) आषाढी वारीनिमित्त अमळनेर येथील श्री सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल-रुक्मिणी संस्थानाच्या पायी पालखी सोहळ्यासोबत वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी जिल्हा परिषद जळगावच्या आरोग्य विभागाने विशेष वैद्यकीय पथकाची प्रतिनियुक्ती केली आहे. पंढरपूर यात्रेदरम्यान वारकऱ्यांना तातडीची वैद्यकीय मदत, प्रथमोपचार, औषधोपचार तसेच साथरोग प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी या पथकावर सोपविण्यात आली आहे.

या पथकात समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. जय भाऊसाहेब देशमुख, आरोग्य सेवक प्रथमेश संतोष पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम लक्ष्मण पाटील तसेच आरोग्य कर्मचारी उपेंद्र दहिवद यांचा समावेश असून, पालखीसोबत संपूर्ण प्रवासात ते वारकऱ्यांना आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पथकाने आवश्यक औषधसाठा सोबत ठेवला असून ताप, सर्दी, जुलाब, उलट्या, वेदना, अॅलर्जी आणि संसर्गजन्य आजारांवरील विविध औषधे, इंजेक्शने, सलाईन, ओआरएस, कापूस, बँडेज, सिरिंज आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. रुग्णांची दैनंदिन नोंद, औषध वितरण, रोगनिहाय उपचारांची माहिती रजिस्टरमध्ये नोंदविणे तसेच प्रतिनियुक्ती संपल्यानंतर वैद्यकीय अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वारीदरम्यान आरोग्य पथकाने पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवरही विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सडावण, पारोळा, आडगाव, भडगाव आणि नगरदेवळा येथील मुक्कामस्थळी टँकर व नळाच्या पाण्याची नियमित तपासणी करण्यात आली. ऑर्थो टोलिडीन (ओटी) चाचणीद्वारे क्लोरीनची पातळी तपासून निर्जंतुकीकरणाची खात्री करण्यात आली. भडगाव येथे टँकरच्या पाण्यात दुर्गंधी आढळून आल्याने तातडीने क्लोरीन टाकून पाणी शुद्धीकरणाची कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर संबंधितांना पाणी वापराबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.

पालखी सोडण्यापूर्वी दुसऱ्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्याकडे विधिवत कार्यभार सोपविणे बंधनकारक करण्यात आले असून, आदेशाचे पालन न केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. आषाढी वारीदरम्यान हजारो वारकऱ्यांच्या आरोग्याचे संरक्षण, सुरक्षित पिण्याचे पाणी, साथरोग प्रतिबंध आणि तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध राहावी, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केलेली ही व्यवस्था यात्रेच्या यशस्वी आणि सुरक्षित आयोजनासाठी महत्त्वाची ठरत आहे.

 

स्वच्छतेसाठी फिरते शौचालय व स्नानगृहाची सुविधा

 

ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद जळगाव यांच्यामार्फत कार्यकारी अभियंता राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, कनिष्ठ अभियंते ऋषिकेश देशमुख, संदीप पाटील, विश्वजीत पाटील तसेच विभागातील इतर सहकाऱ्यांच्या देखरेखीखाली अमळनेर ते पंढरपूर या पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी २५ फिरती शौचालये व २५ स्नानगृहे कार्यान्वित करण्यात आली आहेत. या सर्व सुविधांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा तसेच वापरासाठी आवश्यक पाण्याचा नियमित पुरवठा करण्यात येत असून, वारकऱ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

 

त्यामुळे मार्गातील मुक्कामस्थळी वारकऱ्यांना स्वच्छतागृह व स्नानाची सुविधा मिळत असून, उघड्यावर शौचास जाण्याचे प्रमाण कमी होण्यास तसेच संसर्गजन्य आजारांचा धोका टाळण्यास मदत होत आहे. वैद्यकीय सेवा, पिण्याच्या पाण्याची तपासणी, औषधोपचार आणि स्वच्छता सुविधा यांचा समन्वय साधून वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ व निरोगी वारीचा अनुभव मिळावा, यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.

 

आषाढी वारी ही सेवा, श्रद्धा आणि समर्पणाची परंपरा

 

“आषाढी वारी ही केवळ पायी यात्रा नसून सेवा, श्रद्धा आणि समर्पणाची परंपरा आहे. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने वैद्यकीय पथक, औषधसाठा, पाणी तपासणी तसेच फिरते शौचालय व स्नानगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेमुळे वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि निरोगी वातावरणात विठुरायाच्या दर्शनाचा लाभ घेता येईल. या सेवेत सहभागी झालेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सेवाभावी व्यक्तींचे संस्थानतर्फे मनःपूर्वक आभार.”

प. पू. प्रसाद महाराज, गादी पुरुष, संत सखाराम महाराज संस्थान, अमळनेर.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *