बांधकाम सुरू असतानाच काळाचा घाला; विहिरीत पडून ३३ वर्षीय ठेकेदाराचा मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी)  तालुक्यातील वासरे येथे घराचे बांधकाम सुरू असताना विहिरीची मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या बांधकाम ठेकेदाराचा पाय घसरून विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. दिनेश साहेबराव कोळी (वय ३३, रा. बेटावद, ता. शिंदखेडा) असे मृत ठेकेदाराचे नाव असून, १९ नोव्हेंबर रोजी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दिनेश साहेबराव कोळी हे बांधकामाचे ठेके घेत होते. अमळनेर तालुक्यातील वासरे येथे एका घराच्या बांधकामाचा ठेका त्यांनी घेतला होता. या बांधकामाच्या ठिकाणी १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ते विहिरीची मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी अचानक पाय घसरल्याने त्यांचा तोल गेला आणि ते विहिरीत पडले. ही घटना लक्षात येताच त्यांना विहिरीतून बाहेर काढून तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेने बांधकाम क्षेत्रातील सहकारी आणि नातेवाइकांवर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी मृत दिनेश कोळी यांचे चुलतभाऊ सुरेश कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ विनोद साळी करीत आहेत.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *