
कत्तलीसाठी दोन बैलांची निर्दयी वाहतूक; ताडेपुरातील दोघांवर गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) कत्तलीच्या उद्देशाने दोन बैलांना छोटा हत्ती वाहनातून दाटीवाटीने आणि निर्दयीपणे बांधून वाहतूक करताना गोरक्षकांनी पकडल्याचा प्रकार १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अमळनेर येथे उघडकीस आला. याप्रकरणी ताडेपुरा येथील बंटी कैलास धनगर व दादू कैलास धनगर या दोघांविरुद्ध प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सचिन अशोक महाजन (वय ३०) यांनी फिर्याद दिली. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता गोरक्षक विश्वनाथ विष्णू चौधरी यांनी फोन करून एका विनानंबरच्या छोटा हत्ती वाहनातून गजानन महाराज मंदिराजवळील पुलाखालून एक बैल गुपचूप इदगाह मैदानाकडे नेला जात असल्याची माहिती दिली. त्यानुसार सचिन अशोक महाजन, नीरज अनिल चौधरी व गणेश नगराज महाजन हे तिघे घटनास्थळी गेले असता इदगाह मैदानाच्या बाजूला झाडाझुडपात दोन बैल दाटीवाटीने आणि निर्दयीपणे घट्ट बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी तत्काळ ११२ क्रमांकावर संपर्क साधून घटनेची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम सहकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत बंटी कैलास धनगर व दादू कैलास धनगर (दोघे रा. ताडेपुरा) हे गोरक्षकांना पाहून छोटा हत्ती वाहन घेऊन तेथून पळून गेले. गोरक्षकांनी दोन्ही बैलांची सुटका करून त्यांना गोशाळेत पोहोचविले. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा १९७६ चे कलम ५ (अ), ५ (ब) तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (ड) व ११ (१) (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.

Leave a Reply