नगरपरिषदेचा कत्तलखाना आठ दिवसांत बंद करा; अन्यथा नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी!

गोवंश कत्तलीच्या आरोपावरून विश्व हिंदू परिषद-बजरंग दल आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

अमळनेर (प्रतिनिधी) येथील नगरपरिषदेच्या अधिकृत कत्तलखान्यात वारंवार गोवंशाची कत्तल होत असल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या अमळनेर प्रखंडाच्या वतीने नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. गोवंश कत्तलीच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करण्याची प्रक्रिया आठ दिवसांत सुरू करावी, अन्यथा नगराध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी करण्यात आली आहे. मागण्यांवर ठोस कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपरिषदेच्या कत्तलखान्यात गोवंश कत्तलीचे प्रकार वारंवार घडत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मात्र, नगरपरिषद प्रशासन, संबंधित कर्मचारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्रभावी नियंत्रण, नियमित देखरेख आणि कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही बाब गोवंशप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावणारी असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संघटनेने गोवंश कत्तलीच्या तक्रारींची तातडीने निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. कत्तलखान्यातील संपूर्ण कामकाज, परवाने, पशुवैद्यकीय तपासणी, जनावरांची आवक-जावक आणि संबंधित नोंदींची तपासणी करावी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कत्तलखाना चालकांसह दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, कत्तलखाना तातडीने बंद करून परवाना रद्द करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी, तसेच कत्तलखान्याची जागा व बांधकाम कायमस्वरूपी निरस्त करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ते बांधकाम जमीनदोस्त करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय संबंधित नगरपरिषद कर्मचारी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कर्तव्यपालनाची चौकशी करून दोषींवर विभागीय व कायदेशीर कारवाई करावी आणि केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल आठ दिवसांच्या आत विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाला द्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या गंभीर विषयावर नगराध्यक्षांनी आपली स्पष्ट भूमिका मांडावी, असेही संघटनेने म्हटले आहे.

आठ दिवसांच्या मुदतीत कत्तलखान्यावर ठोस कारवाई करून तो कायमस्वरूपी बंद करण्याची प्रक्रिया सुरू न झाल्यास नगराध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर प्रखंड संयोजक सचिन माळी, प्रखंड मंत्री सचिन चौधरी, प्रखंड गो रक्षक विश्वनाथ मिस्त्री, शहर गो रक्षक स्वप्निल पाटील यांच्यासह डॉ. संजय शाह, तुषार घाणेकर, विश्वनाथ घाणेकर आणि परेश दोषी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *