
खासदार स्मिताताई वाघ यांनी संसदेत जळगावच्या रेल्वे प्रश्नांवर जोरदार मांडणी करीत केला पाठपुरावा
अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार स्मिताताई उदय वाघ यांनी लोकसभेत प्रभावी मांडणी करत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. रेल्वे मंत्रालयाच्या २०२६-२७ च्या अनुदान मागण्यांवरील चर्चेत त्यांनी विविध मुद्दे उपस्थित करत स्थानिक प्रवासी व शेतकऱ्यांच्या समस्या अधोरेखित केल्या.
खासदार स्मिताताई उदय वाघ भाषणाच्या प्रारंभी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेमध्ये झालेल्या बदलांचे कौतुक केले. २०१४ नंतर रेल्वे अधिक आधुनिक, सुरक्षित व गतिमान झाली असून महाराष्ट्राला रेल्वे प्रकल्पांसाठी मोठा निधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत स्थानकांचा विकास, १०० टक्के विद्युतीकरण व नवीन रेल्वेमार्गांची उभारणी ही उल्लेखनीय प्रगती असल्याचे त्यांनी सांगितले. जळगावसाठी महत्त्वाचा उधना-जलगाव रेल्वे कॉरिडॉर सुमारे ८० टक्के पूर्णत्वास गेला असून जुलै २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकल्पामुळे मुंबई-भुसावळ-जलगाव मार्गावरील ताण कमी होऊन प्रवास अधिक जलद होणार आहे. तसेच ‘कवच’ सुरक्षा प्रणालीमुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सूरत-भुसावळ एक्सप्रेस (१९००५) व देवलाली-भुसावळ एक्सप्रेस (११११३) यांच्या वेळापत्रकातील बदलांमुळे प्रवाशांना होत असलेल्या अडचणी त्यांनी ठामपणे मांडल्या व या गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत करण्याची मागणी केली. तसेच उधना-पुणे दरम्यान थेट रेल्वे सेवा सुरू करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. जळगाव स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याची मागणीही त्यांनी केली. कृषीप्रधान जिल्हा म्हणून जळगावात केळी, कापूस यांसारख्या उत्पादनांसाठी कोल्ड स्टोरेज, पार्सल व वेअरहाऊस सुविधा उभारण्याची गरज त्यांनी मांडली, जेणेकरून शेतकऱ्यांना देशातील मोठ्या बाजारपेठांशी थेट जोडता येईल.
दुसऱ्याच दिवशी मंत्र्यांची भेट
लोकसभेतील मांडणीनंतर खासदार वाघ यांनी १७ मार्च रोजी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी उधना-पुणे एक्सप्रेस सुरू करणे, उधना-भुसावळ व देवलाली-भुसावळ गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत करणे, पाचोरा येथे विदर्भ एक्सप्रेस व चाळीसगाव येथे कर्नाटक एक्सप्रेसला थांबा देणे आदी मागण्या त्यांनी मांडल्या.
जळगाव, चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर व धरणगाव परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, कर्मचारी व शेतकऱ्यांच्या अडचणींचे सविस्तर निवेदन त्यांनी सादर केले. रेल्वेमंत्र्यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करून लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती खासदार वाघ यांनी दिली.

Leave a Reply