
आदिवासी संस्कृतीचा जागर; अमळनेरात भव्य गौरव मिरवणुकीने दुमदुमले शहर
अमळनेर (प्रतिनिधी) आदिवासी संस्कृती, परंपरा आणि समृद्ध वारशाचे जतन व संवर्धन करण्याचा संदेश देत जागतिक आदिवासी दिनानिमित्त अमळनेर येथे आदिवासी समन्वय समितीच्या वतीने भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आणि आदिवासी गौरव मिरवणुकीचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा, लोकनृत्य, आदिवासी गीतांचा जागर आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरामुळे अमळनेर शहराला आदिवासी संस्कृतीचा रंग चढला होता.
ताडेपुरा येथे आयोजित भव्य मंचावर आदिवासी जननायक बिरसा मुंडा, वीर एकलव्य यांच्यासह आदिवासी नायक व क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. जयश्री पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, महिला नेत्या रिताताई बाविस्कर, एकलव्य सेनेचे राजन साळवी, सुमनताई साळवी, रणजित शिंदे, आनंद पवार आणि विकास पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी धरतीपूजन तसेच धरती गीताचे गायन करण्यात आले. कार्यक्रमाला एरंडोल येथील संजय पवार, पनवेल येथील भारतीताई, पारोळा येथील दिपक वाघ, नगरसेविका शोभाबाई गढरे, नगरसेवक सुयोग धनगर, विजय पाटील, दुर्गेश पाटील तसेच सरपंच निलाबाई भील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी आदिवासी मुला-मुलींनी पारंपरिक लोकगीते आणि आदिवासी संगीताच्या तालावर नृत्य सादर केले. ग्रामीण भागातून आलेल्या बालकलावंतांनी पारंपरिक लोकनृत्यांचा आकर्षक नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
ही मिरवणूक ताडेपुरा, चोपडा नाका, बोरी नदी पूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, दगडी दरवाजा, तिरंगा चौक आणि बसस्थानक मार्गे महाराणा प्रताप चौकात पोहोचली. येथे आदिवासी समन्वय समितीच्या वतीने समन्वयक आनंद पवार आणि विकास पवार यांनी खासदार स्मिता वाघ आणि आमदार अनिल पाटील यांच्या शुभेच्छांसह सहभागी सर्व आदिवासी बांधवांचे आभार मानले. मिरवणुकीत नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर, माजी आमदार शिरीष चौधरी, नगरसेवक अनिल महाजन, सभापती नाविद शेख, नाना धनगर यांच्यासह विविध मान्यवर सहभागी झाले.
कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून उपक्रमाला यश
या भव्य आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम आणि गौरव मिरवणुकीच्या यशस्वी आयोजनासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विकास पवार, अजय पवार, धनराज मालचे, गुलाब बोरसे, आकाश भील, राहुल मोरे, अजय भील, ईश्वर भील, कैलास भील, सुनील भील, सुधाकर पवार, सागर सोनवणे, अमोल भील, रविंद्र भील, नरेश चव्हाण, किरण फुलपगारे आणि राहुल भील यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
आदिवासी संस्कृतीची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविणाऱ्या या सांस्कृतिक सोहळ्यामुळे अमळनेर शहरात वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. आदिवासी समन्वय समितीच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक करण्यात आले
सहभागी सर्व नृत्यकलावंतांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक अजय पवार यांनी केले, तर सूत्रसंचालन शिंदे यांनी केले.
पारंपरिक वेशभूषेत हजारो बांधवांचा सहभाग
आदिवासी गौरव मिरवणुकीची सुरुवात जयश्री पाटील, अशोक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या हस्ते करण्यात आली. सांस्कृतिक सोहळ्यात शहरातील तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. पारंपरिक वाद्यांसह आधुनिक बँडच्या आदिवासी गीतांवर पारंपरिक वेशभूषेतील आदिवासी बांधव-भगिनी, युवक-युवती उत्साहाने थिरकले. मिरवणुकीत भगवान बिरसा मुंडा, तंट्यामामा भील आणि वीर एकलव्य यांच्या वेशभूषेतील तसेच विविध आदिवासी जनजातींच्या पारंपरिक पेहरावातील मुलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
.

Leave a Reply