अमळनेरात श्री गोरक्षनाथ जन्मोत्सव उत्साव; वरुथिनी एकादशीनिमित्त नवनाथ चैतन्य महापूजेचे आयोजन

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील प्राचीन नाथ संजीवन समाधी मंदिरात चैत्र वद्य वरुथिनी एकादशीनिमित्त सोमवार (दि. १३) परमपूज्य श्री गोरक्षनाथ जन्मोत्सव व नवनाथ चैतन्य महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यासाठी नाशिक येथून मोठ्या संख्येने नवनाथ भक्त मंडळी अमळनेर येथे येणार असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्राचीन नाथस्थानावर योगी श्री गोरक्षनाथांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून, दरवर्षी नवनाथ भक्त मंडळाच्या वतीने मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात गोरक्षनाथ जयंती व नवनाथ चैतन्य महापूजा साजरी केली जाते. यंदाही विविध धार्मिक विधी, पूजन आणि आरतीद्वारे जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवनाथ भक्त मंडळ, अमळनेर यांनी केले आहे.

 

मंदिराचा ऐतिहासिक वारसा असा

 

अमळनेर-चोपडा रोडवरील गायत्री शक्तिपीठामागे असलेले हे नाथपंथीय समाधी मंदिर साधारणतः तेराव्या शतकातील असल्याचे मानले जाते. भव्य दगडांमध्ये उभारलेले हे मंदिर स्थापत्यदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण असून, मंदिरात प्रवेश करण्यासाठी सुमारे तीन फूट उंचीचे दगडी प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर सुमारे पाच फूट उंच चौथऱ्यावर नाथपंथीय सिद्धांच्या दोन शिवलिंगाकार संजीवन समाधी पाहायला मिळतात. या पवित्र स्थानाचा उल्लेख दिल्लीच्या अल्लाउद्दीन बादशहाने नाथपंथीय तोरणमाळ मठाला दिलेल्या सनदेतही आढळतो, ज्यामुळे या स्थळाचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व अधोरेखित होते.

 

भाविकांना आवाहन

 

श्री गोरक्षनाथ जन्मोत्सवानिमित्त मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी अपेक्षित असून, सर्वांनी शिस्त व भक्तिभाव राखून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाथ परिवार आणि नवनाथ भक्त मंडळ, अमळनेर यांनी केले आहे.या सोहळ्यामुळे अमळनेर शहरात धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण होणार आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *