
झाडी येथे महात्मा फुले द्विशतकीय जयंती वर्षाचा प्रबोधनात्मक प्रारंभ; एकपात्री नाट्यप्रयोगातून सामाजिक संदेश
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील झाडी येथे मराठा सेवा संघामार्फत महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशतकीय जयंती वर्षाचा उत्साहपूर्ण व प्रबोधनात्मक प्रारंभ करण्यात आला. ११ एप्रिलपासून सुरू झालेल्या या जयंती वर्षानिमित्त राज्य व देशभर विविध वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून अमळनेर तालुक्यात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
अमळनेर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अशोक पाटील, अभियान प्रमुख प्रा. डॉ. लीलाधर पाटील व झाडी येथील प्रा. डॉ. विलास पाटील यांच्या विचारविनिमयातून तालुक्यात वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले. त्याअंतर्गत आखाजीच्या पूर्वसंध्येला १८ एप्रिल २०२६ रोजी झाडी येथे अहिराणी एकपात्री नाट्य कलावंत प्रवीण माळी (शिरपूर) यांचा ‘आयतं पोयतं सख्यानं’ हा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन सामान्य शेतकरी वसंतराव साहेबराव पाटील यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थान निवृत्त मुख्याध्यापक भास्करराव साहेबराव पाटील यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त एलआयसी शाखाधिकारी सदानंद अहिरराव उपस्थित होते.
महात्मा फुले यांनी ‘तृतीय रत्न’ नाटकाद्वारे सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवली होती. त्याच परंपरेचा वारसा जपण्यासाठी या गावात एकपात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नाट्यकला व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. गावातील ज्येष्ठ नाट्यकलावंत सुभाष श्रीराम पाटील, लोटन राजाराम पाटील, गणेश विठ्ठल पाटील, मोगल रुस्तम पिंजारी, रामकृष्ण दयाराम पाटील यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या उषाताई भदाने, सुषमा ज्ञानेश्वर पाटील, प्रतिभा महेश पाटील, नीता पाटील, माधुरी पाटील, प्रतिभा पाटील व राजश्री पाटील यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला संविधान जागर अभियान प्रमुख प्रा. अशोक पवार, गावरानी जागल्या सेना अध्यक्ष विश्वास पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या वसुंधराताई लांडगे, उमेद अभियान प्रमुख सीमाताई रगडे, सचिव बापूराव ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते महेशकुमार पारेराव, प्रेमराज पवार, संजय पाटील, पत्रकार मिलिंद पाटील, मुख्याध्यापक सुनील चुडामण पाटील, चेअरमन विजय शेखनाथ पाटील, संचालक श्याम भास्कर पाटील, नाट्यकलाकार रवींद्र भरत पाटील, चित्रपट निर्माते साहेबराव रामभाऊ सयाइस यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठा सेवा संघ- संभाजी ब्रिगेड शाखा झाडी तसेच गावातील गणेश मित्र मंडळ, महाकाल मित्र मंडळ, सिद्धिविनायक मित्र मंडळ, वीर एकलव्य मित्र मंडळ यांच्या तरुणांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विलास पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन राकेश पाटील यांनी मानले.

Leave a Reply