परेशभाऊ सोनवणे स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचा थाटात शुभारंभ; पहिल्याच सामन्यात बाहुबली चॅम्पियन विजयी

अमळनेर (प्रतिनिधी) प्रताप कॉलेजच्या मैदानावर स्वर्गीय परेशभाऊ सोनवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित स्मृती चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेचा गुरुवारी (२६ नोव्हेंबर) थाटात शुभारंभ झाला. उद्घाटनानंतर झालेल्या पहिल्याच अटीतटीच्या सामन्यात बाहुबली चॅम्पियन संघाने शिवराणा संघावर ३ विकेट्स राखून रोमांचक विजय मिळवत स्पर्धेत विजयी सलामी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर क्रिकेट असोसिएशन आयोजित व पराग स्पोर्ट्सतर्फे स्वर्गीय परेशभाऊ सोनवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजता प्रताप कॉलेज मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी उद्योगपती गिरीश जैन (चेन्नई), भावेश जैन (मनुदेवी कोल्ड स्टोरेज व अन्वी ट्रेडर्स), आकाश पवार (कुसुमाई बिझनेस ग्रुप), सामाजिक कार्यकर्ते शरद सोनवणे, प्रा. डॉ. हर्षवर्धन जाधव (प्राचार्य, प्रताप कॉलेज), योगेश मुंदडे (संचालक, खानदेश शिक्षण मंडळ) आणि अक्षय चव्हाण (ए.के. कन्स्ट्रक्शन) यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत महात्मा फुले क्रिकेट क्लब, एन.बी. ब्लास्टर, बाहुबली चॅम्पियन, पवार अँड सन्स, महावीर अवेंजर्स आणि शिवराणा इलेव्हन असे सहा संघ सहभागी झाले आहेत. ६ डिसेंबरपर्यंत दररोज सकाळी व सायंकाळी सामने खेळविण्यात येणार आहेत. क्रिकेटप्रेमींना दर्जेदार सामन्यांचा आनंद घेता यावा आणि स्वर्गीय परेशभाऊ सोनवणे यांच्या स्मृती जपल्या जाव्यात, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामन्यांचा आनंद घ्यावा, असे आवाहन पराग स्पोर्ट्सतर्फे करण्यात आले आहे.

 

पहिल्याच सामन्यात बाहुबली चॅम्पियनची बाजी

 

स्पर्धेतील पहिला सामना शिवराणा आणि बाहुबली चॅम्पियन यांच्यात रंगला. प्रथम फलंदाजी करताना शिवराणा संघाने २० षटकांत ११२ धावा केल्या. शिवराणाकडून निखिल पाटीलने २३ चेंडूंत २५ धावा, अतुल सांडणेने १३ चेंडूंत २० धावा, तर कर्णधार सागर भवसारने ११ धावा केल्या. बाहुबली चॅम्पियनकडून रायस शेख आणि चेतन राजपूत यांनी प्रत्येकी ३, तर फिरोज पठाणने १ विकेट घेत शिवराणा संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. विजयासाठी ११३ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या बाहुबली चॅम्पियन संघाने १९.४ षटकांत ७ विकेट्स गमावत ११३ धावा पूर्ण केल्या. यश अनंतकुमार सूर्यवंशीने ३७ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ४१ धावांची शानदार खेळी केली. रायस शेखने नाबाद ३० धावा, तर वाजिद शेखने अवघ्या ६ चेंडूंत १२ धावा करत विजयात मोलाचा वाटा उचलला. शिवराणा संघाकडून रायस शेख आणि चेतन राजपूत यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. मात्र, बाहुबली चॅम्पियनच्या फलंदाजांनी संयम राखत लक्ष्य गाठले आणि ३ विकेट्स राखून विजय मिळवला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *