
अमळनेर पालिकेची पहिलीच सभा गाजली, शविआची आक्रमक भूमिका
चार तास चाललेल्या सभेत हस्तांतरण फी झाली एक टक्का, 100 बेडच्या हॉस्पिटलसह अनेक विषयांना मंजुरी 
अमळनेर (प्रतिनिधी) येथील पालिकेच्या पहिल्याच सभेत शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी आक्रमक होत सर्वसामान्य नागरिकांच्या हिताविरूद्ध असलेल्या विषयांना कडाडून विरोध केला. प्रत्येक विषयाला अभ्यासपूर्ण विचारणा केल्याने सत्ताधारी कोंडीत सापडले. तर हस्तांतरण फी एक टक्का,100 बेडच्या हॉस्पिटलसह अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली.
सभेच्या पिठासन अधिकारी नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर होते. सभेमध्ये सर्वात जास्त हस्तांतरण फीचा मुद्दा गाजला. अत्यंत गैरवाजवी असलेली 2 टक्के हस्तांतरण फी अगदीच नाममात्र ठेवावी अशी मागणी शहर विकास आघाडीने लावून धरली होती. अखेर सभेत एक टक्का फी मंजूर करा. जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याहीपेक्षा कमी करण्यासाठी आम्ही प्रस्ताव पाठवू असे सत्ताधाऱ्यांकडून आश्वासन मिळाल्याने सदर विषय मंजूर झाला. हस्तांतरण फी वाढ, शहरातील स्वच्छतेच्या समस्या, प्रशासकीय अनागोफ्लदी याबाबत स्वीकृत सदस्य डॉ. डिगंबर महाले यांनी अत्यंत प्रखर विरोधकाची भूमिका घेतली. त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत. जयश्री पाटील या विद्यमान नगरसेविका असल्या तरी त्या माजी नगराध्यक्षाही आहेत. त्यांच्यासह शहर विकास आघाडीच्या अन्य नगरसेविकांनाही सभागृहाच्या शेवटी जागा दिली. त्यावरून जयश्री पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शविआच्या नगरसेवकांनीही ही बाब अत्यंत अशोभनिय असल्याचे बोलून दाखविले. त्यामुळे यापुढे सन्मानपूर्वक जागेवर महिलांना बसविले जाईल, असे सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिले. अत्यंत गोलमोल विषय व संदिग्ध टिपण्या आणि सत्ताधारी नगरसेवकांचा वारंवारचा हस्तक्षेपी गोफ्लधळ यावरून डॉ.महाले यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला.
शविआच्या नगरसेवकांच्या वॉर्डातील अत्यावश्यक सेवा- सुविधा पुरविण्याबाबत पालिका करीत असलेल्या दुजाभावाबद्दल अयोग्य विषय व गोलमाल टिपण्या यावरून शविआच्या राजू फापोरेकर, गोपी कासार, भरत ललवाणी, सचिन पाटील, विजय पाटील, देवेंद्र कांबळे, प्रा. योगिता कापडणेकर, स्वप्ना पाटील, शोभाबाई गढरे, नंदा संदानशिव, जुबेदाबी शेख, अफसाना खाटीक, कविता राजपूत यांनी तीव्र आक्षेप घेतला. शविआने जनहिताच्या विषयांना जोरदार समर्थनही दिले. त्यात शहरात शंभर बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे, महिला व बालकल्याण सभापती स्वाती परदेशी यांनी मागणी केल्यावरून बालकांना दफन करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, शहीद जवानांच्या परिवाराला करमाफी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील संकुलाला डॉ. बाबासाहेबांचे नाव देणे यासारख्या विषयांना शविआने उत्स्फूर्त जोरदार समर्थन दिले. पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांचेही शविआने कौतुक केले.या सभेत नगराध्यक्ष डॉ.परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, जयश्री पाटील, डॉ. डीगंबर महाले, श्रीराम चौधरी, पंकज चौधरी, साहेबराव पवार, सचिन पाटील आदींनी चर्चेत सहभाग नोंदविला. यावेळी मुख्याधिकारी गणेश शिंदे सह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply