एका निष्पाप जीवाचा बळी गेला… तरीही न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ! नगावकरांचा संताप अनावर; ‘मास्टरमाईंड’सह सर्व आरोपींच्या अटकेसाठी प्रशासनाला घेराव!

शरद पाटील हत्या प्रकरणाने नगाव हादरले; आरोपी फरार, कुटुंबीयांचा आक्रोश आणि प्रशासनाच्या भूमिकेवर ग्रामस्थांचे गंभीर प्रश्न!

 

अमळनेर (प्रतिनिधी )नगाव येथील शरद रतन पाटील यांना डंपरखाली चिरडून ठार मारल्याच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरला असताना, अद्याप सर्व संशयित आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्याने ग्रामस्थांचा संताप आता रस्त्यावर उतरला आहे. एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला, पत्नीच्या संसाराचा आधार तुटला, आईच्या डोळ्यांतील आशा संपली; मात्र या घटनेतील सर्व आरोपींना अटक होईपर्यंत ग्रामस्थांचा लढा थांबणार नसल्याचा निर्धार मोर्चातून व्यक्त करण्यात आला. शरद पाटील यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या सर्व आरोपींना तातडीने अटक करावी, या प्रकरणातील कथित सूत्रधार आणि त्यांना सल्ला देणाऱ्यांचीही चौकशी करून कारवाई करावी, तसेच २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या वादातील वाळूचे ट्रॅक्टर जप्त करावेत, या मागण्यांसाठी नगाव ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत रस्ता रोको आंदोलन केले.

निष्पाप साक्षीदार ठरला मृत्यूचा बळी?

 

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी शरद रतन पाटील, प्रवीण गोसावी यांच्यासह काही जण जेवणासाठी जात असताना विपुल गोसावी याने चारचाकी वाहनाने कट मारल्याचा आणि त्यानंतर वाहन थांबवून दमदाटी केल्याचा आरोप आहे. याचदरम्यान वाळूने भरलेला डंपर तेथे आला. डंपरचालक भरत सुभाष पाटील याने डंपर शरद यांच्या अंगावर घातल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या डंपरचे मालकत्व आणि घटनेतील कथित चिथावणी याबाबतही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी भरत पाटील याला अटक करण्यात आली असून डंपर आणि चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. तर विपुल गोसावी, मयूर बोरसे आणि सागर गोसावी हे अद्याप फरार असल्याची माहिती आहे.

 

२८ ऑक्टोबरच्या वादातूनच हत्येची पार्श्वभूमी?

 

या संपूर्ण घटनेला २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या वादाची पार्श्वभूमी असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. ज्ञानेश्वर गोसावी यांच्या घराजवळ वाळू उपसा सुरू असताना ट्रॅक्टर मागे घेताना धक्का लागल्याने वाद निर्माण झाला होता. त्यावेळी काही जणांनी दमदाटी केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाची तक्रार उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि तलाठी यांच्याकडे करण्यात आली होती. तलाठी महेंद्र पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा केला होता. या पंचनाम्यात शरद पाटील साक्षीदार असल्याने त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या आरोपांची सखोल चौकशी होणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रशासनाला घेराव; आमदार अनिल पाटील यांची मध्यस्थी महेश पाटील, विनोद पाटील, भूषण पाटील आणि किरण बोरसे यांच्या नेतृत्वाखाली मृत शरद पाटील यांच्या पत्नी, आई, नातेवाईक तसेच गावातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले. तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या मांडत रस्ता रोको करण्यात आला. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.

यावेळी आमदार अनिल पाटील यांनी मोर्चास्थळी भेट देत शिष्टमंडळासह उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, डीवायएसपी विनायक कोते आणि तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांची भेट घेतली.

गुन्ह्याचा तांत्रिक तपास करावा, कॉल रेकॉर्ड तपासावेत, उपलब्ध व्हिडिओ आणि अन्य पुराव्यांचे विश्लेषण करावे; मात्र या गुन्ह्यातील कथित मास्टरमाईंड आणि त्याच्या सल्लागारांनाही अटक करण्यात यावी, अशी मागणी आमदार अनिल पाटील यांनी केली.

 

कायद्याच्या चौकटीत कारवाईचे प्रशासनाचे आश्वासन

 

मोर्चेकऱ्यांनी महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. तहसीलदारांनी संबंधित तलाठ्याला नोटीस दिल्याचे सांगितले. मात्र २८ ऑक्टोबरच्या घटनेतील ट्रॅक्टर ताब्यात घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.

उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करता येईल, असे स्पष्ट केले. तर डीवायएसपी विनायक कोते यांनी उपलब्ध पुराव्यांचे विश्लेषण करून तपासाच्या आधारे आरोपींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

अखेर तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांनी संबंधित तलाठी आणि पोलीस प्रशासनाला २८ ऑक्टोबरच्या घटनेतील ट्रॅक्टर पकडण्याबाबत लेखी आदेश दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

 

आता प्रश्न एकच… शरद पाटील यांच्या कुटुंबाला न्याय कधी?

 

या आंदोलनातून एक बाब प्रकर्षाने समोर आली आहे. एखाद्या नागरिकाच्या जीवावर बेतणाऱ्या वादाची तक्रार प्रशासनापर्यंत पोहोचते, पंचनामा होतो, साक्षीदारही असतो; तरी पुढे अशी दुर्दैवी घटना घडते, ही बाब निश्चितच गंभीर आहे.

शरद पाटील यांच्या मृत्यूची निष्पक्ष आणि सखोल चौकशी होणे, प्रत्येक आरोपीची कायद्यानुसार जबाबदारी निश्चित होणे आणि दोषींना न्यायालयात शिक्षा होण्यासाठी प्रभावी तपास होणे आवश्यक आहे.

कारण प्रश्न केवळ एका शरद पाटलांचा नाही… प्रश्न आहे एका कुटुंबाच्या उद्ध्वस्त झालेल्या संसाराचा, एका आईच्या आक्रोशाचा आणि न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या संपूर्ण नगाव गावाचा!

न्याय मिळेपर्यंत नगावकरांचा आवाज थांबणार का, की प्रशासनाच्या ठोस कारवाईने या कुटुंबाला न्यायाचा दिलासा मिळणार? आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *