दुष्काळाच्या सावटात मंगळग्रह सेवा संस्थेची ‘माणुसकीची दिवाळी’; एक हजारांवर गरजूंना फराळ वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) एकीकडे दुष्काळजन्य परिस्थितीचे सावट आणि दुसरीकडे दिवाळीचा सण अशा परिस्थितीत गरजूंच्याही घरात आनंदाचा दीप उजळावा, या सामाजिक भावनेतून मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माणुसकीची दिवाळी’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील १८ हून अधिक गावांमधील एक हजारांपेक्षा जास्त गरजूंना दिवाळी फराळ किटचे वाटप करण्यात आले. तसेच गरजू कुटुंबांना नवीन आणि वापरण्यायोग्य कपड्यांचे वितरण करून त्यांच्या दिवाळीत गोडवा निर्माण करण्यात आला.

संस्थेचे विश्वस्त आणि सेवेकरी यांनी अनोरे, शिरूड, तासखेडे, आमोदे, तासखेडा, गलवाडे, अमळगाव, खौशी, गंगापुरी, कन्हेरे, पातोंडा, लोण, मारवड, सात्री, कळमसरे, रत्नापिंप्री, दापोरी आणि कोळपिंप्री या गावांमध्ये जाऊन फराळ किटचे वाटप केले. काही गावांतील गरजू कुटुंबांना नवीन ड्रेस, तर काही ठिकाणी वापरण्यायोग्य जुने कपडेही वितरित करण्यात आले. आर्थिक परिस्थितीमुळे सणाचा आनंद साजरा करण्यात अडचणी येणाऱ्या कुटुंबांना या मदतीचा आधार मिळाला. त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सणासुदीच्या काळात मदतीचा हात मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे वर्षभर विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रम राबविले जातात. गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्याच्या या कार्याला व्यापक स्वरूप मिळावे, तसेच गरजूंची दिवाळीही आनंददायी व्हावी, यासाठी दानशूर व्यक्तींनी फराळ, कपडे आणि अन्नधान्याच्या स्वरूपात मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले होते.

या उपक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे तसेच मंगल सेवेकरी विनोद कदम, प्रकाश मेखा, बाळा पवार यांच्यासह मंदिरातील सेवेकऱ्यांनी सहभाग घेतला. दिवाळीचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा संदेश ‘माणुसकीची दिवाळी’ या उपक्रमातून गावागावांत देण्यात आला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *