
अमळनेरकरांना खासदारकीचा ‘दमदार’ फायदा! स्मिता वाघांच्या प्रदर्शनाला साडेबारा हजारांची गर्दी
प्रगतिशील महाराष्ट्र प्रदर्शनात आमदार अनिलदादा पाटील यांच्याकडून खासदार स्मिताताई उदय वाघ यांचा गौरव
अमळनेर (प्रतिनिधी) “आपल्या तालुक्याचा खासदार असल्याचा काय फायदा होतो, हे अमळनेरकरांना या केंद्रीय प्रदर्शनाच्या निमित्ताने स्मिताताई वाघ यांनी दाखवून दिले आहे. कृषी, हस्तकला, नाबार्ड, अणुऊर्जा, संरक्षण आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था यांसह विविध विभागांच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांना नौदल आणि हवाई दलातील करिअरच्या संधींची माहिती मिळाली. हे पाहून नागरिक आनंदित झाले,” असे गौरवोद्गार आमदार अनिलदादा पाटील यांनी काढले.
अमळनेर येथील कलागुरू मंगल कार्यालयात आयोजित ‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’ प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. तीन दिवसांत साडेबारा हजारांहून अधिक नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. खा. स्मिताताई उदय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली येथील फ्रेंड्स एक्झिबिशन अँड प्रमोशन यांच्या वतीने शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी तीन दिवसीय प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला. यावेळी पारोळा-एरंडोलचे आमदार अमोल पाटील, भाजपच्या प्रदेश सचिव भैरवी वाघ-पलांडे, माजी सभापती दिनकर पाटील, डॉ. अनिल शिंदे, डी. जी. पाटील, एरंडोलचे नगराध्यक्ष नरेंद्र ठाकूर, चेतन राजपूत, लालचंद सैनानी, सुरेश पाटील, के. बी. साळुखे, कपिल पाटील, नितीन पाटील, संजू तात्या पाटील, अमोल चव्हाण, भारती सोनवणे, जिजाबराव पाटील, राहुल पाटील, योगेश महाजन आणि कलागुरू ग्रुपचे पंकज गोकलाणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विविध सरकारी विभागांच्या उत्कृष्ट सादरीकरणासाठी पारितोषिकांचे वितरण करून प्रदर्शनाची सांगता करण्यात आली.
यावेळी बोलताना आयोजिका खा. स्मिताताई वाघ म्हणाल्या की, अमळनेरसारख्या शहरात केंद्र व राज्य शासनाच्या योजना आणि उपक्रमांचे प्रदर्शन भरविणे हे आव्हानात्मक होते. तालुक्याच्या ठिकाणी केंद्रीय स्तरावरील वरिष्ठ अधिकारी येण्यास फारसे उत्सुक नसतात. मात्र, आपल्या तालुक्यातील नागरिकांना केंद्रस्तरीय अधिकारी आणि विविध शासकीय योजनांची माहिती मिळावी, यासाठी गेल्या चार महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. तीन दिवसांत बारा ते तेरा हजार नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
पारोळा-एरंडोलचे आमदार अमोल पाटील यांनीही प्रदर्शनाचे कौतुक केले. “रस्ते, गटारी आणि वीज यांपलीकडे सरकार कोणकोणते उपक्रम राबवते, याची माहिती देणारे हे प्रदर्शन थक्क करणारे होते,” असे ते म्हणाले. प्रारंभी दत्ता थोरे यांनी प्रास्ताविक केले. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर अखिला श्रीवासन यांनी आभार मानले.
विविध सरकारी विभागांना उत्कृष्ट सादरीकरणासाठी पुरस्कार
प्रदर्शनात उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विविध सरकारी विभागांना सन्मानचिन्हे व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट स्टॉलचा पुरस्कार यंत्र इंडिया लिमिटेड आणि म्युनिशन्स इंडिया लिमिटेड यांना देण्यात आला. नवोपक्रम विभागातील उत्कृष्ट स्टॉलचा पुरस्कार भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई यांना, तर वित्तीय साक्षरता विभागातील उत्कृष्ट स्टॉलचा पुरस्कार भारतीय रिझर्व्ह बँकेला मिळाला. संवाद व नवोपक्रम विभागातील उत्कृष्ट स्टॉलसाठी महाजेनकोचा गौरव करण्यात आला.
ऊर्जा क्षेत्रातील सर्जनशील सादरीकरणासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अर्थात महावितरण, अणुऊर्जेच्या प्रसारासाठी न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, गुणवत्ता व ज्ञानप्रसारासाठी भारतीय मानक ब्युरो, डिजिटल प्रशासनासाठी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, तसेच डिजिटल समावेशन व भाषा तंत्रज्ञानासाठी डिजिटल इंडिया-भाषिणी विभाग यांना पुरस्कार देण्यात आले.
संवादात्मक सादरीकरणासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, पारंपरिक वैद्यकशास्त्राच्या प्रसारासाठी केंद्रीय सिद्ध संशोधन परिषद व आयुष मंत्रालय, तर वैज्ञानिक नवोपक्रमासाठी वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद यांचा गौरव करण्यात आला. लोकसंवाद विभागात भारतीय स्टेट बँक, भारतीय चहा मंडळ आणि भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ यांना सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply