
कळमसरे-शहापूर रस्त्यावर फरशी पुलाच्या खड्ड्यात बुलेटसह कोसळून युवकाचा मृत्यू
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे-शहापूर रस्त्यावर सुरू असलेल्या फरशी पुलाजवळ भीषण अपघात होऊन एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार (ता. ७) रोजी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्ते सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सुनील सीताराम शिंदे (वय अंदाजे २७ वर्षे, रा. सोनगीर, जि. धुळे) हे कळमसरे येथे लग्न समारंभासाठी कुटुंबासह आले होते. हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री उशिरा ते बुलेट दुचाकीने घरी परतत होते. दरम्यान, शहापूर-कळमसरे रस्त्यावरील सुरू असलेल्या फरशी पुलाजवळ अंधारात मोठा खड्डा असल्याने त्यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि बुलेटसह ते थेट खड्ड्यात कोसळले. या खड्ड्यातील सिमेंट पाईपच्या कडेला ते अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची घटना रात्री उशिरा घडली असली तरी सकाळी संबंधित ठेकेदाराचे कर्मचारी कामावर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, फरशी पुलाजवळ कोणतेही सुरक्षा कठडे, इशारा फलक किंवा प्रकाश व्यवस्था नसल्यानेच हा अपघात घडल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. अपघातानंतर मात्र घाईघाईने सूचना फलक व सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
मृत सुनील शिंदे यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा अशा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply