कसाली मोहल्ल्यात मध्यरात्री भीषण आग; अग्निशामक दल आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील कसाली मोहल्ल्यात काल मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. काही क्षणातच आगीचे स्वरूप उग्र झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र अमळनेर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या धाडसी आणि समन्वयपूर्ण प्रयत्नांमुळे मोठी जीवित व वित्तहानी टळली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या शांततेत अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि ठिणग्या उडाल्या. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने नगर परिषदेच्या अग्निशामक दलाशी संपर्क साधला.

आगीची बातमी कळताच परिसरातील माजी व विद्यमान नगरसेवक तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. केवळ उपस्थित राहून नव्हे तर प्रत्यक्ष आग विझवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. फिरोज पठाण, नासिर हाजी, नवीद शेख, नाना धनगर, गुलाम नबी, इमरान शेख, अरमान हलवाई, वसीम पठाण, तय्यब पठाण, रिजवान मनियार, नईम पठाण, छोटू भोई, सुपडू मणियार आदी नागरिकांनी अग्निशामक दलाला मोलाची मदत केली. पाण्याचे टँकर उपलब्ध करून देणे, तसेच आग पसरण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षित अंतर राखण्याचे काम नागरिकांनी शिस्तबद्धपणे केले.

अरुंद गल्ली, दाट धुराचे लोट आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने जीवाची पर्वा न करता शर्थीचे प्रयत्न केले. नागरिक व लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे आग आसपासच्या घरांपर्यंत पोहोचण्याआधीच आटोक्यात आणण्यात यश आले. या सामूहिक सतर्कतेमुळे कसली मोहल्ला मोठ्या दुर्घटनेपासून वाचला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *