
वाढदिवसाला समाजसेवेची जोड; एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या अनाथ मुलांना प्रोटीन व सकस आहार किट वाटप
अमळनेर (प्रतिनिधी) “वाढदिवस म्हणजे केवळ केक कापण्याचा सोहळा नाही, तर एखाद्याच्या जीवनात आशेचा दिवा पेटवण्याची संधी आहे,” या उदात्त भावनेतून रोटरी क्लब अमळनेर, आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर आणि अंकुर सेतू प्रकल्प अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या अनाथ मुला-मुलींसाठी सकस आहार व प्रोटीन किट वाटपाचा हृदयस्पर्शी कार्यक्रम रोटरी हॉल, अमळनेर येथे उत्साहात पार पडला.
रिषभ फर्निचरचे संचालक कैलास जैन आणि कल्पना जैन यांनी आपल्या सुपुत्राच्या वाढदिवसानिमित्त २५ प्रोटीन किटचे योगदान देत वाढदिवसाला समाजसेवेचे सुंदर रूप दिले. त्याचबरोबर आधार बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सकस आहाराचे किराणा किट वाटप करण्यात आले. या उपक्रमातून गरजू मुलांच्या आरोग्यदायी भविष्यासाठी मोलाची साथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैलास जैन होते. यावेळी रोटरी क्लब अमळनेरचे नवनिर्वाचित अध्यक्ष महेश पाटील आणि सचिव प्रशांत निकम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ज्येष्ठ रोटेरियन विवेक देशमुख, चेलाराम सेनानी, दिलीप भावसार, सनी कोठारी, पूनम कोचर, राजेश बेतमुथा, रोहित शिंगवी, कीर्तीकुमार कोठारी, विनोद थोरात, अजय रोडगे, सचिन जैन, सौरभ जैन, धीरज अग्रवाल तसेच आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील, कार्यकारी संचालिका रेणू प्रसाद, प्रकल्प समन्वयक संजय कापडे, पूनम पाटील, राकेश महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सेवाकार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले.
या उपक्रमातून गरजू मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि त्यांच्या डोळ्यांतील समाधान हेच सेवाकार्याचे खरे यश ठरले. समाजसेवा ही केवळ दानधर्म नसून माणुसकीची सुंदर अभिव्यक्ती आहे, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
वाढदिवसाच्या निमित्ताने स्वतःच्या आनंदासोबत समाजातील गरजू घटकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचा हा उपक्रम अमळनेरमध्ये माणुसकी आणि सेवाभावाचे प्रेरणादायी उदाहरण ठरला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भारती पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संजय कापडे यांनी प्रभावीपणे केले.

Leave a Reply