
शिरूड विकास सहकारी सोसायटीची ३१व्या वर्षीही १०० टक्के कर्जफेड; परंपरा राखली कायम
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरूड येथील विकास सहकारी सोसायटीने ३१ मार्च रोजी सतत ३० व्या वर्षी १०० टक्के कर्जफेड करून आपली परंपरा कायम राखली आहे. सोसायटीमार्फत वितरित करण्यात आलेले २ कोटी ९५ लाख ३३ हजार रुपयांचे पीककर्ज शेतकऱ्यांनी ३१ मार्च रोजी पूर्णपणे भरल्याने जिल्हा बँकेचे कर्ज पूर्ण फेडले गेले असून सोसायटीच्या करंट खात्यात उर्वरित रक्कम जमा झाल्याची माहिती सोसायटीतर्फे देण्यात आली.
तालुक्यातील शिरूड गावाने दरवर्षी वेळेत कर्जफेड करण्याची परंपरा जपली असून जिल्हा बँकेचे कर्ज १०० टक्के फेडणाऱ्या गावांमध्ये शिरूड गावाचा आदर्श मानला जातो. सोसायटीची गावात प्रशस्त सागवान लाकडाची भव्य इमारत असून त्याच इमारतीत जिल्हा बँकेची शाखा कार्यरत आहे. तसेच सोसायटीमार्फत गावात स्वस्त धान्य दुकान व दुकान संकुलही चालविण्यात येत आहे. सोसायटीच्या प्रगतीमध्ये गावातील सर्व शेतकरी, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. सन २०२५-२६ या वर्षात १०० टक्के कर्जफेड पूर्ण होण्यासाठी चेअरमन अरुण पाटील, व्हाईस चेअरमन सविता पाटील, संचालक प्रा. सुभाष पाटील, बापूराव महाजन, गोरख धनगर, धोंडू मास्तर, अनंतराव मोरे, सुभाष महाजन, सीताराम पाटील, भास्कर पाटील, वासुदेव पाटील, तिलोत्तमा पाटील, शाम बापू, मीराताई पाटील तसेच सेक्रेटरी रविंद्र आप्पा, सेल्समन वीरभान जीभू, बापू मोरे, बँकेचे व्यवस्थापक शेषराव साहेब, सोनवणे साहेब, आहिराव साहेब, भाऊसाहेब पाटील, प्रफुल पाटील, सुपडू पाटील, वसंत पाटील, नंदू पाटील आदींचे सहकार्य लाभल्याचे सोसायटीतर्फे सांगण्यात आले. शिरूड विकास सहकारी सोसायटीच्या या कामगिरीमुळे गावातील शेतकऱ्यांची आर्थिक शिस्त आणि सहकारभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. इतर गावांनीही शिरूडच्या या आदर्शाचा आदर्श घ्यावा, असे मत गावकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

Leave a Reply