झेप महिला संघाची मोठी झेप; महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे : आमदार अनिलदादा पाटील

अमळनेर (प्रतिनिधी) मारवड येथील भिकन भालेराव सायन्स कॉलेज येथे आयोजित उमेद अभियानाच्या कार्यक्रमात झेप महिला प्रभाग संघाच्या कार्याचे आमदार अनिलदादा पाटील यांनी कौतुक केले. महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे आणि शेतीकन्या फार्मर गटाने उत्पादनाच्या विक्रीसाठी गुणवत्तेवर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती अमळनेर अंतर्गत कळमसरे-जळोद गटाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार अनिलदादा पाटील म्हणाले की, झेप महिला प्रभाग संघाने खरोखरच मोठी झेप घेतली असून, त्यांचे काम कौतुकास्पद आहे. शेतीकन्या फार्मर गटाने आपल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी गुणवत्तेवर भर द्यावा आणि महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार स्मिता वाघ होत्या. त्या म्हणाल्या की, महिलांनी छोट्या-छोट्या उद्योगांपासून सुरुवात करून मोठे उद्योग उभे करावेत. तसेच महिलांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. शंभर टक्के महिलांनी बचत गटात सहभागी होऊन आर्थिक सक्षम होण्याच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले. समन्वयिका ललिता पाटील, बी. एम. किशोर पवार व व्यवस्थापिका ज्योती भावसार यांच्या प्रयत्नातून खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते सेंट्रल बँकेकडून १३ महिला गटांना एक कोटी चार लाख रुपयांच्या कर्ज मंजुरीचे पत्र देण्यात आले.

कार्यक्रमाला खासदार स्मिता वाघ, माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील, नगरसेविका जयश्री पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे राजू लोखंडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक हरेश्वर भोई, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, जिल्हा व्यवस्थापक सुशील पाटील, महेंद्र लांबोळे तसेच सरपंच भिकन भालेराव पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियान तालुका व्यवस्थापिका सीमा रगडे यांनी केले. वैशाली साळुंखे आणि मंदाकिनी पाटील यांनी महिला गटांच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रभाग समन्वयिका ललिता पाटील, समन्वयक पंडित राठोड, योगेश भामरे, जितेंद्र भोई, मधुकर राठोड तसेच ग्रामसखी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन योगिता पाटील व नवशाद बी. पिंजारी यांनी केले. आभार समन्वयक ललिता पाटील यांनी मानले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *