२० रुपयांच्या तेलावरून वाद; दुकानदार दाम्पत्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी)  पैसे कमी दिल्याच्या संशयावरून झालेल्या वादातून दुकानदाराने पती-पत्नीला काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना २१ रोजी रात्री आठ वाजता घडली. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात दुकानदार दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सुनीता रवींद्र पाटील (रा. खापरखेडे) यांनी त्यांचा मुलगा राज याला २० रुपये देऊन संजय साहेबराव पाटील यांच्या दुकानातून तेल आणण्यासाठी पाठवले होते. त्यावेळी दुकानात संजय पाटील यांच्या पत्नी संगीता पाटील उपस्थित होत्या. २० रुपये दिल्यानंतरही त्यांनी १५ रुपयांचे तेल दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. याबाबत मुलाने विचारणा केली असता संगीता पाटील यांनी त्याच्या कानशिलात मारल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

मुलाने घरी येऊन घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितल्यानंतर सुनीता रवींद्र पाटील व रवींद्र पाटील हे दुकानावर जाऊन २० रुपये दिले असताना १५ रुपयांचे तेल का देण्यात आले, याबाबत विचारणा करीत होते. त्यावेळी संगीता पाटील यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर संजय साहेबराव पाटील यांनी हातातील काठीने रवींद्र पाटील यांच्या उजव्या खांद्यावर मारहाण करून जखमी केले. तसेच सुनीता पाटील या मध्यस्थी करण्यासाठी गेल्या असता त्यांच्या कपाळावर व डोक्यावरही काठीने मारहाण करून जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, झालेल्या झटापटीत सुनीता पाटील यांच्या गळ्यातील सुमारे ४ ग्रॅम सोन्याची पोत पडून गहाळ झाल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी सुनीता रवींद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय साहेबराव पाटील व संगीता संजय पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५, ३५१(२), ३५२ व ३२४(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी संजय श्रावण पाटील करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *