
कार्यादेशानंतर तीन महिने उलटले; अमळनेर बस आगाराचे काँक्रिटीकरण ठप्प!
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर बस आगारातील वाहनतळाच्या काँक्रिटीकरणासाठी ६ जुलै २०२६ रोजी कार्यादेश देण्यात आला असतानाही तीन महिने उलटून गेले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याची अट असताना मुदतीचा निम्मा कालावधी संपत आला आहे. विशेष म्हणजे काम सुरू करण्यासाठी ठेकेदाराला नोटीसही देण्यात आलेली नसल्याचे एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याने महामंडळाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
नाशिक येथील कार्यकारी अभियंत्यांनी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मेसर्स व्ही.टी. परदेशी अँड सन्स यांना वर्क कमेन्समेंट ऑर्डर क्रमांक १३/२०२६-२७ अन्वये ६ जुलै २०२६ रोजी कार्यादेश दिला आहे. या कामाची अंदाजित निविदा रक्कम १ कोटी ९६ लाख ७ हजार ७६० रुपये असून स्वीकारलेली सुधारित निविदा रक्कम १ कोटी ९४ लाख ६८ हजार ५४५ रुपये आहे. कार्यादेशाच्या दिनांकापासून सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे बंधन ठेकेदारावर आहे. मात्र, अद्याप काम प्रत्यक्ष सुरू झालेले नाही. कार्यादेशात काम सुरू करण्यापूर्वी कामगार परवाना घेणे, कामगार व कामाचा विमा काढणे, दरमहा कामाचा कार्यक्रम सादर करणे, मंजूर अंदाजपत्रकाच्या मर्यादेत काम करणे तसेच निर्धारित दर्जा व गुणवत्ता कायम ठेवणे अशा विविध अटी नमूद आहेत. या अटींची पूर्तता होत आहे की नाही, याची तपासणी करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची असताना प्रत्यक्ष कामच सुरू न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, २८ सप्टेंबर रोजी वृत्तपत्र व खबरीलाल पोर्टल ने अमळनेर बस आगारातील सुमारे दोन कोटी रुपयांच्या काँक्रिटीकरणाला विलंब होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावेळी कार्यकारी अभियंत्यांनी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगून ठेकेदाराला नोटीस देऊन एक-दोन दिवसांत काम सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतरही काम सुरू झालेले नाही. उलट, विभागीय अभियंता (स्थापत्य) निलेश पाटील यांनी आता काम सुरू करण्याबाबत ठेकेदाराला नोटीस देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापूर्वीच्या आश्वासनाचे पुढे काय झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कार्यादेशाला तीन महिने उलटूनही काम सुरू झालेले नसताना करारातील अटींनुसार दंडात्मक कारवाई, मुदतभंगाबाबत नोटीस किंवा पुढील कार्यवाही का करण्यात आली नाही, याचे स्पष्टीकरण महामंडळाकडून अपेक्षित आहे. ठेकेदाराला काम सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली आहे का, याबाबतही प्रवाशांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत.
दुसरीकडे, निविदेच्या ऑनलाइन प्रक्रियेत आजही केवळ तांत्रिक निविदा उघडल्याची स्थिती दिसत असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रत्यक्षात मात्र ६ जुलै रोजी ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला आहे. त्यामुळे ऑनलाइन नोंदी आणि प्रत्यक्ष प्रशासकीय प्रक्रियेत तफावत का दिसत आहे, याबाबत पारदर्शकता आवश्यक आहे.
अमळनेर बस आगारातील वाहनतळाची सध्याची अवस्था प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. उखळलेली खडी, खड्डे, धूळ आणि पावसाळ्यातील चिखलामुळे बसमध्ये चढताना-उतरताना प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच सामान घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा विशेष त्रास सहन करावा लागत आहे. कोट्यवधी रुपयांचे काम मंजूर होऊनही प्रत्यक्ष काम सुरू होत नसेल तर प्रवाशांना आणखी किती काळ या गैरसोयीला सामोरे जावे लागणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
एक-दोन दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल
अमळनेर बस आगारात बसेस उभ्या करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून प्रत्यक्ष पाहणीही करण्यात आली आहे. एक-दोन दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. प्रवाशांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी टप्प्याटप्प्याने काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल. काम सुरू करण्याबाबत ठेकेदाराला नोटीस देण्यात आलेली नाही.
निलेश पाटील, विभागीय अभियंता (स्थापत्य), एस.टी. महामंडळ, जळगाव
जागा मोकळी झाल्यानंतर बसेस उभ्या करण्यात येतील
अमळनेर आगारात ७५ बसेस आहेत आगाराच्या मध्यभागीही बांधकाम सुरू असून तेथील रॉ मटेरियल हटविण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. ही जागा मोकळी झाल्यानंतर तेथे बसेस उभ्या करण्यात येतील. त्यामुळे पुढील भागातील काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात करता येईल.
राहुल शिवदे, आगार प्रमुख, अमळनेर

Leave a Reply