देवदर्शनाचा आनंद क्षणात शोकात बदलला; गलवाडेहून परतताना दोघांचा दुर्दैवी अंत

भंडाऱ्याचा प्रसाद घेऊन परतताना नियतीचा घाला; रंजाणेच्या दोघा मित्रांचा दुर्दैवी अंत, अमळनेर तालुका हादरला

अमळनेर (प्रतिनिधी )गलवाडे येथील धार्मिक कार्यक्रम आटोपून स्कुटीवरून घरी परतणाऱ्या दोन जणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ३० ऑगस्ट रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास अमळनेर-गलवाडे रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळ घडली. भरधाव स्कुटीचा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला जोरदार धक्का बसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने रंजाणे परिसरावर शोककळा पसरली आहे.

मृतांमध्ये पंडित धाकू भिल (वय ५०) आणि नागो अमृत सपकाळे (वय ४५), रा. रंजाणे यांचा समावेश आहे. दोघेही गलवाडे येथे भंडारा-प्रसादाच्या कार्यक्रमासाठी स्कुटी क्रमांक एमएच ५४ ई ७६४ वरून गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पुन्हा रंजाणेकडे परतत होते. पंडित भिल हे स्कुटी चालवत होते, तर नागो सपकाळे मागे बसले होते.

गलवाडेहून परतताना पेट्रोल पंपाजवळ स्कुटीवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या डंपर क्रमांक एमएच १८ एम ७८५७ वर जाऊन आदळली. धडक इतकी तीव्र होती की दोघांनाही गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

 

धार्मिक कार्यक्रमातून परतताना काळाने गाठले…

 

काही वेळापूर्वी भंडाऱ्याचा प्रसाद घेऊन आनंदाने परतणाऱ्या दोघांवर अचानक काळाने झडप घातली. घरच्यांना सुखरूप परतण्याची वाट पाहत असतानाच त्यांच्या मृत्यूची बातमी पोहोचल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुर्दैवी घटनेने रंजाणे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

 

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत केली पाहणी

 

अपघाताची माहिती मिळताच डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, वाहतूक पोलीस संजय बोरसे, विनय पाटील, मयूर पाटील, गणेश पाटील आणि अविनाश भदाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविले. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *