
कपिलेश्वर मंदिर परिसरात प्रेमीयुगुलांवर दामिनी पथकाची कारवाई
पालकांना न सांगता फिरण्यासाठी आलेल्या चार जणांची चौकशी; दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कपिलेश्वर मंदिर परिसरात संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या दोन प्रेमीयुगुलांवर मारवड पोलिसांच्या दामिनी पथकाने कारवाई केली. ही कारवाई ९ जून रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील यांना कपिलेश्वर मंदिर परिसरात दोन प्रेमीयुगुल संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी दामिनी पथकातील हेडकॉन्स्टेबल रेखा ईशी, प्रियांका शिरसाठ, परवेझ शेख आणि सुमित गिरासे यांना पेट्रोलिंग करून आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
दामिनी पथक घटनास्थळी पोहोचले असता दोन तरुण व दोन तरुणी मंदिर परिसरात फिरताना आढळून आले. चौकशीदरम्यान चारही जण गोंधळल्याचे निदर्शनास आले. पुढील तपासात ते सर्व अमळनेर येथील रहिवासी असल्याचे समोर आले. तसेच संबंधित तरुणी आपल्या पालकांना कोणतीही माहिती न देता मुलांसोबत फिरण्यासाठी आल्याचेही स्पष्ट झाले.
यानंतर चौघांनाही सहाय्यक पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी संबंधित मुलींच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यांना समज देऊन मुलींना पालकांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच संबंधित तरुणांवर प्रतिबंधात्मक स्वरूपाची कलम ११२ व ११७ अन्वये कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद हालचाली रोखण्यासाठी व महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दामिनी पथकाकडून नियमित गस्त व तपासणी मोहीम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Leave a Reply