
नगराध्यक्षांसह सत्ताधाऱ्यांविरुद्ध जनआक्रोश; हजारोंचा मोर्चा, तरी कत्तलखाना पाडण्याचा निर्णय लटकला
४१ पैकी केवळ १० नगरसेवकांची उपस्थिती; विशेष सभा गणपूर्तीअभावी तहकूब, नगराध्यक्ष सोशल मीडियावर ट्रोल

अमळनेरमध्ये दिवसभर कडकडीत बंद; तीन जणांचे बेमुदत आमरण उपोषण सुरूच
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करून त्याची इमारत जमीनदोस्त करावी, या मागणीसाठी अमळनेरमध्ये शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) अडीच ते तीन हजार नागरिकांचा जनआक्रोश नगरपरिषदेवर धडकला. शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला; मात्र एवढ्या मोठ्या आंदोलनानंतरही नगराध्यक्ष आणि सत्ताधारी गटाकडून कत्तलखाना पाडण्याबाबत ठोस निर्णय होऊ शकला नाही. आंदोलनाची दखल घेत बोलावलेल्या विशेष सभेला ४१ पैकी केवळ १० नगरसेवक उपस्थित राहिल्याने गणपूर्तीअभावी सभा तहकूब झाली. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांवर सोशल मीडियातूनही टीकेची झोड उठली असून त्यांना ट्रोल करण्यात आले. दुसरीकडे विजय धनराज पाटील, विश्वनाथ मिस्त्री आणि गोपाल वाघ या तिघांचे नगरपरिषदेसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरूच आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील नगरपरिषदेच्या कत्तलखान्यात वारंवार गोवंश कत्तलीचे प्रकार उघडकीस येत असल्याच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, गोरक्षक आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. प.पू. गोविंददास महाराज (नंदगाव), प.पू. सुशील महाराज (विटनेर), राष्ट्रीय किन्नर आखाड्याचे महंत हरिहरानंदगिरी उर्फ दादू महाराज, महंत गौरीताई, राकेश रोहा, डॉ. संजय शहा, विजय पाटील, विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाचे प्रखंड संयोजक सचिन माळी, प्रखंड मंत्री सचिन चौधरी, विश्वनाथ मिस्त्री आणि स्वप्निल पाटील यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. पाचपावली चौक आणि लालबाग शॉपिंग परिसरातून मार्गक्रमण करत मोर्चा नगरपरिषदेवर धडकला. कत्तलखाना जमीनदोस्त करा, दोषींवर कठोर कारवाई करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोर्चेकऱ्यांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत दहा प्रमुख मागण्या मांडल्या. नगरपरिषदेच्या माध्यमातून चालविण्यात येणारा कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करून कायदेशीर प्रक्रियेनुसार जमीनदोस्त करावा, कत्तलखाना चालविणारे परवानाधारक आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, गोवंश हत्येतील मुख्य आरोपी व संघटित गुन्हेगारीत सहभागी असलेल्यांवर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. कत्तलखान्याच्या कामकाजात निष्काळजीपणा अथवा गैरप्रकार आढळल्यास संबंधित नगरपालिका कर्मचारी, आरोग्य निरीक्षक आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी करून निलंबनासह कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली. शेतकऱ्यांचे चोरीला जाणारे गोवंश शोधण्यासाठी विशेष तपास पथक नियुक्त करावे, गोवंश चोरीच्या घटनांना कायमस्वरूपी आळा घालून शेतकरी व गोपालकांना न्याय द्यावा, रेल्वे पट्ट्यालगत ज्या पत्र्याच्या शेडमधून तीन गोवंशांची सुटका करण्यात आली होती ते शेड तातडीने निष्कासित करावे, तसेच अधिकृत कत्तलखान्यालगत असलेले अनधिकृत दोन खोल्यांचे बांधकाम पाडावे, अशा मागण्यांचाही समावेश होता. शहर व तालुक्यातील गोवंश हत्येच्या घटनांना आळा घालण्याची मागणी करत कत्तलखाना उद्ध्वस्त करण्याची कारवाई नगराध्यक्षांकडून होत नसेल तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी थेट भूमिका आंदोलकांनी घेतली. केवळ आश्वासन न देता मागण्यांवर प्रत्यक्ष कारवाई करावी, अन्यथा मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा इशाराही देण्यात आला. मोर्चाला सामोरे जाताना लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर आणि प्रभारी मुख्याधिकारी रोशन राजपूत यांनी कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करण्यात आला असून त्याला सील लावण्यात आल्याची माहिती दिली. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून देखरेखीसाठी कर्मचारी नियुक्त केल्याचेही सांगण्यात आले. मात्र, कत्तलखाना केवळ बंद करून सील लावणे पुरेसे नसून त्याची इमारतच जमीनदोस्त करावी, या मागणीवर आंदोलक ठाम राहिले. त्यानंतर खासदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष, सभापती, पालिका पदाधिकारी, पोलीस अधिकारी आणि हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. सभापती साहेबराव पवार, सभापती कैलास पाटील, माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन, श्रीराम चौधरी, विक्रांत पाटील, सूरज परदेशी, प्रताप साळी, डिगंबर महाले, डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, एपीआय गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड आणि नामदेव बोरकर यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत कत्तलखाना परिसरातील अतिक्रमित खोल्या तातडीने हटविण्यात येतील, तसेच कत्तलखान्याची इमारत पाडण्यासाठी शासनाची परवानगी घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, ठोस निर्णय होईपर्यंत उपोषण मागे घेण्यास आंदोलकांनी नकार दिला. मोर्चात आशिष दुसाने, अमर सोनार, परेश जोशी, जयेश चौधरी, जगदीश महाजन, पवन बारी, मनोज महाजन, अमोल महाजन, बाळू गुरव, नीरज चौधरी, ओम महाजन, अजय महाजन, योगेश लांडगे, विजय बारी, सागर कोळी, मितेश कामदार, प्रसाद महाजन, विनायक चौधरी, अभय महाजन, योगेश महाजन, मनोज मराठे, गणेश जाधव आणि प्रवीण पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.
विशेष सभेलाही गणपूर्तीचा अडसर
जनआक्रोशाची तीव्रता लक्षात घेऊन नगराध्यक्ष, सत्ताधारी गटातील नगरसेवक आणि प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता नगरपरिषद सभागृहात तातडीची विशेष सभा बोलावली होती. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाकडून जनआक्रोश आंदोलन आणि बेमुदत आमरण उपोषणाबाबत प्राप्त निवेदनावर विचारविनिमय करणे हा सभेचा प्रमुख विषय होता. याशिवाय अमळनेर-धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याबाबतही निर्णय अपेक्षित होता. मात्र, या सभेला नगराध्यक्ष डॉ. परीक्षित श्रीराम बाविस्कर, कैलास नामदेव पाटील, श्रीराम भगवान चौधरी, स्वाती सूरजसिंग परदेशी, सुयोग ज्ञानेश्वर धनगर, अनिल गंगाराम महाजन, नीलिमा विश्वनाथ पाटील, स्वप्निल विक्रांत पाटील, साहेबराव वसंत पवार आणि डिगंबर विठ्ठल महाले असे केवळ १० सदस्य उपस्थित होते. एकूण ४१ सदस्यांपैकी आवश्यक गणपूर्ती पूर्ण न झाल्याने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम ९ अन्वये कलम ९ (ब) नुसार सभा तहकूब करण्यात आली. आता ही सभा शनिवारी (२८ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता पुन्हा आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे हजारोंच्या जनआक्रोशानंतरही कत्तलखाना पाडण्याबाबतचा अधिकृत निर्णय अधांतरी राहिला आहे.
राजकीय पदाधिकाऱ्यांची आंदोलनाकडे पाठ
एवढ्या मोठ्या जनआक्रोशाच्या आंदोलनात प्रमुख राजकीय पक्षांचे शहर व तालुकास्तरीय पदाधिकारी तसेच सत्ताधारी आणि विरोधी गटातील अनेक नगरसेवक सहभागी झाले नाहीत. वार्डातील मतांच्या राजकारणामुळे लोकप्रतिनिधींनी आंदोलनापासून अंतर राखल्याची चर्चा शहरात रंगली. दुसरीकडे मोर्चातील गर्दीमुळे धुळे-चोपडा रस्त्यावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार, बांधकाम व्यावसायिक आणि अन्य व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवल्याने बाजारपेठेसह शहरातील बहुतांश व्यवहार ठप्प झाले.
सायंकाळी अतिक्रमित खोल्यांवर कारवाई
आंदोलकांच्या मागणीची दखल घेत सायंकाळी पाच वाजेनंतर नगरपरिषद प्रशासनाने कत्तलखान्याशेजारी असलेली दोन अनधिकृत बांधकामे निष्कासित केली. त्यामुळे आंदोलनादरम्यान देण्यात आलेल्या आश्वासनानुसार पहिली प्रत्यक्ष कारवाई झाली असली, तरी मुख्य कत्तलखान्याची इमारत जमीनदोस्त करण्याचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

Leave a Reply