
राज्यस्तरीय स्क्वॉश स्पर्धेत राणाईचेच्या मोक्षदा पाटीलला कांस्यपदक
अमळनेर (प्रतिनिधी) राणाईचे येथील मोक्षदा प्रदीप पाटील हिने राज्यस्तरीय स्क्वॉश स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावले आहे. तिच्या या यशामुळे राणाईचे गावासह अमळनेर तालुक्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्क्वॉश फेडरेशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय स्क्वॉश स्पर्धेत मोक्षदा प्रदीप पाटील हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. मैदानावरील जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, खेळातील कौशल्य आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर तिने कांस्यपदकाची कमाई केली. आजच्या स्पर्धात्मक युगात मुलींनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही आपले कर्तृत्व सिद्ध करणे महत्त्वाचे आहे. मोक्षदाने मिळविलेले हे यश इतर विद्यार्थिनी आणि नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. सातत्यपूर्ण सराव, योग्य मार्गदर्शन आणि जिद्दीच्या जोरावर ध्येय गाठता येते, हे तिने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे. मोक्षदाच्या या यशाबद्दल तिचे पालक, मार्गदर्शक, प्रशिक्षक, शिक्षक, मित्रपरिवार आणि क्रीडाप्रेमींकडून अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यातही तिने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशा सदिच्छा व्यक्त होत आहेत.
मोक्षदाचे स्वप्नील पाटील यांच्याकडून कौतुक
राज्यस्तरीय स्क्वॉश स्पर्धेत कांस्यपदक मिळविल्याबद्दल स्वप्नील पाटील यांनी मोक्षदा प्रदीप पाटील हिचे कौतुक करून तिच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply