अमळनेर न्यायालयात उद्देशिकेच्या सामूहिक वाचनातून संविधान मूल्यांचा केला जागर

अमळनेर (प्रतिनिधी) लोकशाहीच्या मूल्यांचा सन्मान आणि संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अमळनेर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरात २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अमळनेर वकील संघाच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात विधिज्ञ, पक्षकार आणि नागरिकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, इयत्ता सातवीतील चिमुकलीच्या मनोगताने उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमाची सुरुवात संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. वकील संघाचे अध्यक्ष ॲड. गोपाळ सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. ए. के. बाविस्कर यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संविधानातील तत्त्वांचे जतन करण्याची व संविधानाप्रती निष्ठा राखण्याची भावना व्यक्त केली. याप्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. आर. व्ही. निकम यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करत आधुनिक भारताच्या जडणघडणीतील संविधानाचे महत्त्व सविस्तरपणे विशद केले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेल्या इयत्ता सातवीतील चिमुकलीने आपल्या सहजसुंदर शब्दांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त केला. तिच्या मनोगताला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. या सोहळ्यास अमळनेर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. गोपाळ सोनवणे, उपाध्यक्ष ॲड. राकेश बिऱ्हाडे, सचिव ॲड. उदय शिसोदे, सहसचिव ॲड. चेतना यज्ञेश्वर पाटील, सहसचिव प्रणिता नीलेश गांधलीकर यांच्यासह महिला वकील संघ, पुरुष वकील संघाचे पदाधिकारी, ज्येष्ठ व कनिष्ठ विधिज्ञ, पक्षकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲड. मंगेश पाटील यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ॲड. अविनाश खैरनार, ॲड. रोहित ढिवरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *