
दिव्यांग विद्यार्थिनींना कॉलेजपासून तीन किलोमीटर पुढे उतरविले; अमळनेर आगाराच्या चालकाची मनमानी
अमळनेर (प्रतिनिधी) दिव्यांग सप्ताहातच अमळनेर आगाराच्या बसचालकाने दोन दिव्यांग विद्यार्थिनींना महाविद्यालयाजवळ बस न थांबवता तीन किलोमीटर पुढे नेऊन उतरविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे दिव्यांग संघटनेने संताप व्यक्त केला असून संबंधित चालकावर कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे संकेत आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांनी दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर ते पारोळा मार्गावरील अमळनेर आगाराची बस क्रमांक ३९६९ ने साक्षी चौधरी व भारती पाटील या विद्यार्थिनी अमळनेरहून रत्नापिंप्री येथील शिवधामजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आय.टी.आय. महाविद्यालयात जाण्यासाठी निघाल्या होत्या. महाविद्यालयाजवळ उतरविण्याची त्यांनी वाहकाला विनंती केली. या महाविद्यालयाला महामंडळाने रीतसर बसथांब्यासाठी परवानगी दिलेली आहे. विद्यार्थिनींच्या विनंतीनंतर वाहकाने बेल दिली. मात्र, चालकाने बस न थांबवता त्यांना भोकरबारीच्या टेकडीवर उतरविले. त्यामुळे विद्यार्थिनींना दुसऱ्या पर्यायी व्यवस्थेने महाविद्यालयात जावे लागले.
अशी वागणूक मानवता धर्माला शोभत नाही
दिव्यांग महिला यांना अशी वागणूक द्यायला नको होती.सदर चालकांची चौकशी करून कारवाई करावी.भारतात जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांग सप्ताह साजरा होत असताना अशी वागणूक मानवता धर्माला शोभत नाही.तसेच अमळनेर बस आगारात फोन करून तक्रार केली असता.त्यांनी सुध्दा दुरध्वनी वरुन उध्दट पणे उत्तरे देऊन अपमानास्पद वागणूक दिली आहे. रविंद्र पाटील, राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना, मुंबई
चालकाच्या मनमानीमुळे तीन किलोमीटर पुढे उतरविले
आम्ही वाहकांना विनंती केली तसेच मात्र चालंकाची मनमानी मुळे आम्ही तिन किलोमीटर पुढे उपरविले गेली.सदर चालकाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
साक्षी चौधरी, विद्यार्थिनी
मनमानी खपवून घेतली जाणार नाही
संबंधित चालकाची तक्रार प्राप्त झाल्यावर सखोल चौकशी करून त्याच्यावर कारवाई करतो. वृद्ध ,दिव्यांग , महिला , बालके यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांची वागणूक असावी. मनमानी खपवून घेतली जाणार नाही
राकेश शिवदे, आगार व्यवस्थापक, अमळनेर

Leave a Reply