
कचऱ्याच्या कारणावरून शेजाऱ्याची महिला व मुलीला मारहाण;तिघांविरुद्ध गुन्हा
अमळनेर (प्रतिनिधी )अंगणातील कचरा झाडण्याच्या किरकोळ कारणावरून शेजाऱ्याने महिला व तिच्या अल्पवयीन मुलीला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना अमळनेरात घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेने दिलेल्या जबाबानुसार, त्या आपले पती योगेश गुलाबराव चौधरी (रिक्षा चालक) व दोन मुलींसह राहतात. घरासमोरच राहणारे सुरेश झगडू चौधरी यांच्याशी त्यांची १० वर्षांपासून ओळख आहे. दि. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता पती शाळेच्या मुलांना सोडण्यासाठी रिक्षा घेऊन गेल्यानंतर, सकाळी ७.४५ वाजता फिर्यादी अंगणात साफसफाई करत असताना सुरेश चौधरी याने “तुझ्या अंगणातला कचरा माझ्या अंगणात का झाडत आहे” असे म्हणत वाद घातला. फिर्यादीने कचरा बाजूला लावते असे सांगूनही त्याने अश्लील शिवीगाळ केली. “तु मला शिवीगाळ का करतो” असे म्हणताच त्याने अंगणात येऊनलज्जास्पद वर्तन करून झटापट केली. यादरम्यान मुलगी मानसी सोडवण्यासाठी आली असता तिलाही चापट मारली. दोघी माय-लेकीने सुटका करून घरात पळ काढला. त्यानंतर सकाळी ८ वाजता पुन्हा सुरेश चौधरी घराबाहेर येऊन शिवीगाळ करू लागला व गेटजवळ येऊन घराबाहेर बोलावू लागला. महिला बाहेर येताच सुरेश चौधरी व त्याचा मुलगा आणि पत्नी रेखा यांनी पुन्हा शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे.यावेळीही मारहाण करणेचा प्रकार घडला. पती घरी आल्यानंतर सर्व प्रकार सांगितल्यावर फिर्यादी ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे जाऊन औषधोपचार घेऊन पोलीस ठाण्यात आली.याप्रकरणी सुरेश झगडू चौधरी, निखिल सुरेश चौधरी व रेखा सुरेश चौधरी या तिघांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात भाग ५ गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ २८९७ विनोद भोई करीत आहेत.

Leave a Reply