
मंगळग्रह मंदिरात भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी मातेचा शाही थाटात नव्हे, तर साधेपणाने झाला विवाह
अमळनेर (प्रतिनिधी) हिंदू संस्कृतीतील पवित्र परंपरा आणि विवाह संस्कारांचे महत्त्व जपण्याच्या उद्देशाने श्री मंगळग्रह मंदिरात भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी माता यांचा प्रतीकात्मक विवाह सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. श्री तुळशी विवाह सोहळ्यानिमित्त मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे आयोजित या उपक्रमाचे यंदा १५ वे वर्ष होते. खर्चिक बाबींना फाटा देत साधेपणाने आणि पूर्णतः वैदिक पद्धतीने झालेल्या या सोहळ्याची हजारो भाविकांनी ‘याची देही याची डोळा’ अनुभूती घेतली.
हिंदू संस्कृतीत श्री तुळशी विवाहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्री तुळशी मातेच्या विवाहानंतर विवाहोत्सुक वधू-वरांच्या विवाहाच्या ब्रह्मगाठी बांधल्या जातात, अशी धार्मिक परंपरा आहे. ही परंपरा कायम टिकून राहावी आणि श्री मंगळग्रह मंदिरात येणाऱ्या विवाहेच्छुकांच्या इच्छापूर्तीसाठी परमेश्वराची विशेष आराधना व्हावी, या उद्देशाने मंगळग्रह सेवा संस्थेने काही वर्षांपूर्वी या सोहळ्याची सुरुवात केली. त्रिपुरारी पौर्णिमा अर्थात कार्तिकी पौर्णिमेच्या निमित्ताने मंगळवारी, २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी मातेचा प्रतीकात्मक विवाह वैदिक पद्धतीने पार पडला. या विवाह सोहळ्यात वरराजा भगवान श्री विष्णूजी यांचे मामा म्हणून पिळोदे (ता. अमळनेर, ह. मु. पुणे) येथील भटू प्रकाश शिंदे, तर वधूराणी श्री लक्ष्मी माता यांचे मामा म्हणून अमळनेर येथील सुनील माणिक बिऱ्हाडे (ह. मु. जळगाव) यांनी भूमिका निभावली. तत्पूर्वी, भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी मातेची संबळ वाद्यांच्या गजरात मंगलरथातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांनी जल्लोषपूर्ण नृत्याचा आनंद घेतला. मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव व प्रसाद भंडारी यांनी मुख्य पौरोहित्य करून विधिवत मंगलाष्टके म्हटली. त्यांना पुरोहित जयेंद्र वैद्य, मंदार कुलकर्णी, वैभव लोकाक्षी, गणेश जोशी, अतुल जोशी, विनोद पाठक, चंद्रकांत जोशी, उमेश पाठक, चेतन नाईक आणि प्रवीण भंडारी यांनी सहकार्य केले. सकाळी श्री मंगळग्रह देवांची महाआरती झाल्यानंतर दिवसभर मंदिर परिसरात भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. कोणत्याही प्रकारची भव्य सजावट किंवा स्नेहभोजनावर खर्च न करता धार्मिक विधी आणि पारंपरिक संस्कारांना प्राधान्य देत हा सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुळकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, मंगल सेवेकरी आशाताई महाले, प्रकाश मेखा, विनोद कदम आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. जी. चव्हाण यांच्यासह मंदिराच्या सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.
असंख्य माता-भगिनींच्या उपस्थितीत हळद-मेंदीचा उत्साह
श्री तुळशी विवाह सोहळ्याच्या पूर्वसंध्येला सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७.३० या वेळेत भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी मातेच्या प्रतीकात्मक विवाहानिमित्त हळद-मेंदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगीताच्या साथीने झालेल्या या कार्यक्रमाला असंख्य माता-भगिनी उपस्थित होत्या. यावेळी महिलांनी नृत्य आणि फुगडीचा मनमुराद आनंद घेतला. संपूर्ण परिसरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
चाली, रूढी आणि परंपरांचे परिपूर्ण जतन
मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे समाजाभिमुख आणि काळाची गरज असलेला विवाह सोहळा साधेपणाने करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. विवाह सोहळ्यात पैशांची उधळपट्टी न करता तो पूर्णतः विधिवत आणि पारंपरिक पद्धतीने करण्याची शपथ घेण्याचे आवाहन या उपक्रमातून केले जाते. त्याच संकल्पनेतून मागील काही वर्षांपासून श्री तुळशी विवाह सोहळा साधेपणाने, मात्र पारंपरिक चाली, रूढी आणि परंपरांचे जतन करून साजरा केला जात आहे. भव्य सजावट आणि स्नेहभोजनावर संस्थेतर्फे कोणताही खर्च केला जात नाही. देवांचा विवाह अत्यंत साधेपणाने, मात्र पूर्णतः शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडण्याची परंपरा संस्थेने जपली आहे.

Leave a Reply