
दोन बांधकाम विभागांची टोलवाटोलवी; महामार्ग क्र. १५ ला वाली कोण?
तुटलेले दुभाजक, उखडलेल्या साइडपट्ट्या, बोरी नदी पुलाची दुरवस्था; बसस्थानकासमोरील काँक्रीटही उखडले

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातून जाणारा धुळे-अमळनेर राज्य महामार्ग क्रमांक १५ समस्यांच्या विळख्यात सापडला असून, वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तुटलेले दुभाजक, उखडलेल्या साइडपट्ट्या, बोरी नदी पुलावरील उखडलेले डांबरीकरण, बसस्थानकासमोरील काँक्रीटची दुरवस्था अशा अनेक समस्यांनी या महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. मात्र, रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी निश्चित करण्याऐवजी सार्वजनिक बांधकाम विभाग, अमळनेर आणि धुळे हे दोन विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने महामार्गाला वाली कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहर हद्दीतील महामार्गावर अनेक ठिकाणी दुभाजक तुटले असून, त्यांना काळे-पिवळे सुरक्षा पट्टे नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनधारकांना धोका निर्माण होत आहे. काही ठिकाणी दुभाजकांची उंची कमी झाली आहे. जागोजागी साइडपट्ट्या उखडल्या असून, रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्यांचाही अभाव आहे. रस्त्यावर झुकलेल्या झाडांच्या जीर्ण फांद्या आणि ड्रेनेजची व्यवस्था नसल्याने साचणारे पावसाचे पाणी या समस्यांमध्ये भर घालत आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोरील अनधिकृत व अतांत्रिक गतिरोधकही वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहेत. शहरातील चौकाचौकांत दिशादर्शक फलक नसल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनचालकांना रस्ता विचारत मार्ग शोधावा लागतो. तहसील कार्यालयासमोरील दुभाजकात काटेरी फांद्या वाढल्या असून, त्या वाहनचालकांच्या डोळ्यांना इजा पोहोचविण्याची शक्यता आहे. लोखंडी दुभाजक तुटल्यामुळे विद्यार्थी आणि नागरिक जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडत आहेत. शहरातील बोरी नदीवरील पुलावरील डांबरीकरण पूर्णतः उखडले असून, रस्त्याचा पृष्ठभाग उघडा पडला आहे. त्यामुळे वाहनधारकांना खड्डे आणि उखडलेल्या पृष्ठभागातून मार्ग काढावा लागत असून, पायी चालणेही मुश्कील झाले आहे. बसस्थानकासमोरील काँक्रीट रस्त्याचेही मोठ्या प्रमाणावर काँक्रीटीकरण उखडले असून, खडी वर आली आहे. यामुळे दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
जबाबदारीवरून दोन विभागांत मतभेद
महामार्गाच्या दुरवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, अमळनेर आणि धुळे या दोन्ही विभागांच्या भूमिकांमध्ये विसंगती समोर आली आहे. अमळनेर विभागाच्या मते, धुळे-अमळनेर राज्य महामार्ग क्रमांक १५ हा २०२० पासून हॅम योजनेत समाविष्ट असल्याने रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी धुळे विभागाकडे आहे. मात्र, धुळे विभागाच्या म्हणण्यानुसार, दुभाजकांचे काम हॅम योजना सुरू होण्यापूर्वीचे असल्याने त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची तरतूद या योजनेत नाही. त्यामुळे संबंधित हॅम ठेकेदाराकडून दुभाजकांची दुरुस्ती करून घेणे शक्य नसून, त्यासाठी अमळनेर विभागाने आवश्यक आर्थिक तरतूद करावी, याबाबत पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. अशा परस्परविरोधी भूमिकांमुळे दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न कायम आहे.
ड्रेनेज, पट्टे आणि सुरक्षेचा अभाव
काँक्रीट रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अपेक्षित असलेली ड्रेनेज व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात रस्त्यावर आणि दुभाजकांजवळ मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. उखडलेल्या साइडपट्ट्या, पांढऱ्या पट्ट्यांचा अभाव आणि दिशादर्शक फलक नसल्याने पादचारी व वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतो. रात्रीच्या वेळी रस्त्यावरील स्पष्ट खुणा आणि परावर्तक सुरक्षा व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढतो. शहरातून जाणाऱ्या या मुख्य महामार्गावर दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी आणि वाहनधारकांची ये-जा सुरू असताना त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल उपस्थित होत आहे.
अपघात घडल्यानंतर जबाबदारी निश्चित करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र, दोन विभागांच्या अधिकारक्षेत्राचा वाद नागरिकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीचे अधिकार आणि जबाबदारी याबाबत कागदोपत्री वादात न अडकता तातडीने निर्णय घेऊन धोकादायक दुभाजक, साइडपट्ट्या, बोरी नदी पुलावरील डांबरीकरण, बसस्थानकासमोरील उखडलेले काँक्रीटीकरण, गतिरोधक, दिशादर्शक फलक, रस्त्यावरील पट्टे आणि ड्रेनेज व्यवस्था सुधारावी, अशी मागणी होत आहे. दोन सार्वजनिक बांधकाम विभागांच्या टोलवाटोलवीत अमळनेरकरांचा जीव मात्र टांगणीला लागला असून, अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दुभाजकांच्या दुरुस्तीची जबाबदारी अमळनेर विभागाने घ्यावी
धुळे-अमळनेर राज्य महामार्गावरील दुभाजकांचे काम हॅम योजना सुरू होण्यापूर्वी करण्यात आलेले आहे. त्यामुळे या दुभाजकांच्या देखभाल व दुरुस्तीची तरतूद हॅम योजनेत समाविष्ट नाही. परिणामी संबंधित हॅम ठेकेदाराकडून ही कामे करून घेणे शक्य नाही. दुभाजकांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी व त्यासाठी आवश्यक तरतूद करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, अमळनेर यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात येईल.
आर. आर. पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे
महामार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारी धुळे विभागाची
धुळे-अमळनेर राज्य महामार्ग क्रमांक १५ हा २०२० पासून हॅम योजनेत समाविष्ट असल्याने या रस्त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे यांच्याकडे आहे. त्यामुळे रस्त्यावरील दुभाजक व इतर संबंधित कामांबाबत धुळे विभागाने आवश्यक कार्यवाही करणे अपेक्षित आहे. त्याबाबत धुळे कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात येईल.
शैलेश शिंदे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमळनेर

Leave a Reply