
कविता तयार करता येत नाही, ती भावनेतून व्यक्त होते : कवी हिरामण कंखरे
अमळनेर (प्रतिनिधी) कविता ही तयार करता येत नाही, ती आपल्या भावनांतून, सुखातून आणि दुःखातून उपजत व्यक्त होत असते, असे मत कवी हिरामण कंखरे यांनी व्यक्त केले.
अमळनेर तालुक्यातील वावडे येथील बी. बी. ठाकरे माध्यमिक विद्यालयात १८ सप्टेंबर रोजी खान्देश साहित्य संघाच्या वर्धापन दिनानिमित्त कथा, कविता व बातमी लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख राजेंद्र वारुळे होते. खान्देश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमध्ये साहित्य लेखन व वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने खान्देशातील विविध ठिकाणी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. वावडे येथील कार्यशाळेचे उद्घाटन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य संघाचे जिल्हा सचिव उमेश काटे, छगन पाटील, कवी हिरामण कंखरे आणि जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता बिऱ्हाडे उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक खान्देश साहित्य संघाच्या तालुकाध्यक्ष सुनीता पाटील यांनी केले. भावी पिढीत साहित्याची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. साहित्य संघाचे कार्यवाह अशोक पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. तालुका उपाध्यक्ष शरद पाटील यांनी कथा कशी लिहावी, कथेतील पात्रे कशी असावीत आणि कथेचा शेवट कसा प्रभावी करावा, याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
भाऊसाहेब देशमुख यांनी विद्यार्थ्यांना कविता, कवितेतील मर्म आणि कवितेचे विविध प्रकार याबाबत मार्गदर्शन केले. साने गुरुजी शिक्षक साहित्य संघाचे राज्याध्यक्ष संजय पाटील यांनी बातमी लेखनाचे नियम, तारतम्य, सत्यता आणि वस्तुनिष्ठता याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचताना बातमीमध्ये कशा प्रकारे बदल होत जातात, हे प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रप्रमुख राजेंद्र वारुळे यांनी अशा उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या लेखनाचा दर्जा सुधारण्यास या कार्यशाळेचा उपयोग होईल, तसेच शालेय अभ्यासातही कथा व बातमी लेखनाचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्यकारिणी सदस्य निरंजन पेंढारे यांनी केले, तर आभार प्रल्हाद पाटील यांनी मानले. कार्यक्रमास रवींद्र देवरे, भाग्यश्री सावळे, जगदीश राजपूत, प्रशांत पवार, प्रभाकर सोनवणे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply