
ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने माणुसकीचा जागर; अमळनेरमध्ये रुग्णांसह गरजूंना फळवाटप
अमळनेर (प्रतिनिधी) : ईद-ए-मिलादुन्नबीच्या पवित्र पर्वानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने अमळनेर येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांनी दिलेल्या प्रेम, करुणा आणि मानवसेवेच्या संदेशातून प्रेरणा घेत ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण तसेच रेल्वे स्थानकावरील गरजू व प्रवाशांना फळांचे वाटप करण्यात आले.
ईद मिलादुन्नबीच्या आनंदात समाजातील गरजू घटकांनाही सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची आस्थेने विचारपूस करून त्यांना फळे देण्यात आली. त्यानंतर रेल्वे स्थानकावर गरजू नागरिक तसेच प्रवाशांना फळवाटप करण्यात आले. या उपक्रमातून सर्वधर्मसमभाव, बंधुभाव आणि माणुसकी हाच ईद मिलादुन्नबीचा खरा संदेश असल्याचे आयोजकांनी सांगितले. सण साजरा करताना समाजातील गरजू आणि वंचित घटकांप्रती संवेदनशीलता जपणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि मानवतेची भावना वृद्धिंगत करणे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष सैय्यद अजहर अली, सरचिटणीस जुनेद शेख आणि कार्याध्यक्ष बबलू शेख यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर, माजी शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष अलीम मुजावर, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष आरिफ भाया, वसीम पठाण, भूषण भदाणे, सैय्यद नबी, दर्शन पाटील, रिजवान मणियार, आसिफ सैय्यद, सलमान बागवान, जावेद शेख, शरूख खान यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून धार्मिक उत्सवाला सामाजिक सेवेची जोड देत अमळनेरमध्ये प्रेम, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देण्यात आला.

Leave a Reply