
सीईओ मीनल करणवाल यांनी अंगणवाडी केंद्रांना भेटी देऊन पोषण आहार आणि कामकाजाची केली पाहणी
अमळनेर (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी अमळनेर तालुक्यातील दहिवद व टाकरखेडा येथील अंगणवाडी केंद्रांना भेट देत तेथील कामकाजाची पाहणी केली. यावेळी चिमुकल्यांना दिल्या जाणाऱ्या पूरक पोषण आहाराची तपासणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात दि. १९ मार्च रोजी होणाऱ्या राष्ट्रीय भूमी सुपोषण संवर्धन अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमाच्या नियोजनासाठी त्या अमळनेर येथे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत चालणाऱ्या अंगणवाडी केंद्रांचीही पाहणी केली. दहिवद व टाकरखेडा येथील अंगणवाड्यांमध्ये भेटीदरम्यान मीनल करणवाल यांनी लहान मुलांशी संवाद साधत त्यांच्या आरोग्य, शिक्षण व पोषण आहाराबाबत माहिती घेतली. त्यांनी प्रत्यक्ष पूरक आहाराचा आस्वाद घेऊन त्याची गुणवत्ता तपासली. तसेच केंद्रातील नोंदी, स्वच्छता, सुविधा आणि दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला. अंगणवाडी सेविका व मदतनीसांकडून विविध योजनांची अंमलबजावणी, लाभार्थ्यांची उपस्थिती आणि पोषण आहार वितरणाबाबत सविस्तर माहिती घेत त्यांनी समाधान व्यक्त केले. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी केंद्रांची भूमिका महत्त्वाची असून ही सेवा अधिक सक्षमपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या वेळी गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, अंगणवाडी पर्यवेक्षिका अलका पाटील यांच्यासह अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.

Leave a Reply