
मंगरूळ येथील आर. के. फूड्स प्रकरणात ४२ शेतकऱ्यांना दिलासा; वजनातील तफावतीचा मोबदला मिळाला
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मंगरूळ येथील आर. के. फूड्समध्ये शेतकऱ्यांच्या गव्हाच्या वजनात आढळलेल्या तफावतीप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांधा समितीने हस्तक्षेप करत ४२ शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. संबंधित व्यापाऱ्याकडून तफावतीचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १० मार्च रोजी आर. के. फूड्स येथे गहू खरेदीदरम्यान वजनात मोठी तफावत आढळल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे तक्रार केली होती. योगेश ट्रेडर्सचे मालक योगेश वाणी यांनी हा गहू खरेदी केला होता. घटनेनंतर तात्काळ पंचनामा करून वजनमाप निरीक्षकाकडे तक्रार करण्यात आली होती. प्रारंभी तफावत आढळलेल्या तीन शेतकऱ्यांना ११ मार्च रोजीच मोबदला देण्यात आला होता. दरम्यान, आणखी ४२ शेतकऱ्यांनीही त्यांच्या मालाच्या वजनात कमी दाखवून फसवणूक झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारींची दखल घेत १७ मार्च रोजी वांधा समितीचे सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील, प्रा. सुभाष पाटील, समाधान धनगर, हिरालाल पाटील, प्रकाश वाणी, ऋषभ पारख, तसेच व्यापारी योगेश वाणी, सचिव डॉ. उन्मेश राठोड आणि प्रशांत नेरकर यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन सखोल चौकशी केली. या तपासात सीसीटीव्ही फुटेज, खरेदी पावत्या, प्लेटकाटा अहवाल तपासण्यात आला. तसेच ट्रॅक्टरचे इतरत्र वजन करून पडताळणी करण्यात आली. यात सुमारे २ ते १० क्विंटलपर्यंत वजनातील तफावत आढळून आली. त्यानंतर संबंधित व्यापाऱ्यास सूचना देऊन त्वरित शेतकऱ्यांना तफावतीचा मोबदला देण्यात आला.
कायदेशीर कारवाई केली जाईल
अमळनेर तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांच्या समक्ष मोबदला देण्यात आला असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
– अशोक पाटील, सभापती, बाजार समिती अमळनेर
तक्रारीनुसार गुन्हा दाखल करू
बाजार समितीला चौकशीचा अधिकार असून, शेतकऱ्यांचे जबाब घेऊन फसवणूक व आर्थिक घोटाळा सिद्ध झाल्यास तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल.
–दत्तात्रय निकम, पोलीस निरीक्षक
कारणे दाखवा नोटीस देऊ
वजनकाट्यात तफावत आढळल्याने तो तातडीने बंद करण्यात आला असून आर. के. फूड्सला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. आठ दिवसांत उत्तर प्राप्त झाल्यानंतर दंडात्मक कारवाई करून वजनकाटा दुरुस्त करण्यात येईल.
–कुमारसिंग राजपूत, वजनमाप निरीक्षक

Leave a Reply