
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत उद्या भूमी सुपोषण आणि संवर्धन अभियानाचा शुभारंभ
अमळनेर (प्रतिनिधी) अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या भूमी सुपोषण व संवर्धन या राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ दि. १९ मार्च रोजी श्री मंगळग्रह मंदिर येथे होणार आहे. दुपारी २ वाजता आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
देशातील शेतीजमिनींची सुपीकता कमी होत चालल्याची गंभीर बाब लक्षात घेऊन हे राष्ट्रव्यापी अभियान सुरू करण्यात आले आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अति वापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडत असल्याने त्यावर उपाययोजना म्हणून २०२१ पासून विविध सामाजिक, धार्मिक संस्था व संघटनांच्या माध्यमातून जनजागृती सुरू करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांत देशभरात सुमारे ३० हजार गावे व ५४ हजार शहरी भागांमध्ये भूमिपूजन व प्रबोधन कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. गुढीपाडव्याच्या मंगल मुहूर्तावर, चैत्र शुद्ध प्रतिपदेला या अभियानाचा राष्ट्रीय स्तरावर शुभारंभ होत असून १९ मार्च २०२६ ते अक्षय तृतीया (१९ एप्रिल २०२६) या कालावधीत देशभर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये भूमिपूजन, शेतकऱ्यांचा सन्मान, प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा, जनजागृती कार्यक्रम व प्रदर्शने आयोजित केली जाणार आहेत.
तसेच शहरी भागात जैविक व अजैविक कचरा वेगळा ठेवणे, सेंद्रिय खत निर्मिती यासारख्या उपक्रमांद्वारेही जनजागृती करण्यात येणार आहे. या अभियानात विविध सामाजिक व धार्मिक संस्था, गोशाळा, स्वयंसेवी संस्था, कृषी विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्रांचा सहभाग राहणार आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रोटरी क्लब, लायन्स क्लब, निरंकारी परिवार तसेच विविध समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
दरम्यान, या कार्यक्रमास कन्हेरी आश्रमाचे प.पू. आदित्य काडसिद्धेश्वर महास्वामी, संतश्री सखाराम महाराज वाडी संस्थानचे प्रसाद महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भागैयाजी, अक्षय कृषी परिवाराचे अध्यक्ष मनोजभाई सोलंकी, उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे, पद्मश्री सुभाष शर्मा, तसेच राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ व आमदार अनिल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्यासाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply